आयआरसीटीसीची नवी वेबसाईट 15 जुलैपासून सुरु होणार, नव्या वेबसाईटमध्ये काय बदलणार?

नवी दिल्ली : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीची अपडेटेड वेबसाईट 15 जुलैपासून सुरु होईल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली आहे.  मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, जयपूर येथे विद्यार्थ्यांनी आयआरसीटीसी पोर्टल संदर्भात तक्रार अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती.

जयपूर येथील विद्यार्थ्यांनी आयआरसीटीसी वेबसाईटवरील कॅप्चा यंत्रणेतील त्रुटींसदर्भात तक्रार अश्विनी वैष्णव यांच्याकडे केले होती. प्रवाशी कॅप्चा संदर्भात तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. पीक अवरच्या काळात तिकीट बुकिंग करताना हा प्रॉब्लेम येतो. विद्यार्थ्यांची तक्रार मिळताच अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना बोलावून विद्यार्थ्यांच्या नव्या वेबसाईटच्या मागणी संदर्भात माहिती दिली.

अश्विनी वैष्णव यांनी यानंतर आयआरसीटीसीचा अपग्रेडेड प्लॅटफॉर्म 30 दिवसांमध्ये तयार होईल असा शब्द दिला. यानंतर नवी वेबसाईट 15 जुलै रोजी लाँच होईल, असं देखील त्यांनी म्हटलं.

आयआरसीटीसीच्या प्लॅटफॉर्मचा रेल्वे तिकीट बुकिंगसाठी वापर करणाऱ्या लाखो प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामध्ये वेबसाईट स्लो होणे, ओटीपीशी संबंधित अडचणी तात्काळ बुकिंग वेळी येतात. वेबसाईटवरील ट्रॅफिक वाढलं सिस्टीमवर लोड येणे, यामुळं आयआरसीटीसीच्या वेबसाईटच्या अपडेशनची मागणी केली जात होती.

एका मिनिटात दीड लाख तिकीट बुकिंगची क्षमता

आयआरसीटीसीनं 2002 मध्ये ऑनलाईन बुकिंग सुरु केलं होतं. आता जवळपास 88 टक्के तिकीटं ऑनलाईन पद्धतीनं बुक केली जातात. आयआरसीटीसीनं गेल्या आठवड्यात तात्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक केलं होतं. आयआरसीटीसीनं 2025 मध्ये 3 कोटी खाती बंद केली होती. तर, 2.94 कोटी खाती तात्पुरती निलंबित केली होती.

नव्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीममध्ये एका मिनिटात दीड लाख तिकीट बुक केली जाऊ शकतील. सध्याच्या  यंत्रणेनुसार  पीआरएसमध्ये एका मिनिटात 32 हजार तिकीट बुक होतात.  तिकीट चौकशी क्षमता देखील वाढवली जाणार असून एका मिनिटात 40 लाख तिकीट चौकशी क्षमता होईल. सध्या ती 4 लाख इतकी आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेकडून रेलवन मोबाईल अॅप्लिकेशन लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये एआयचा वापर करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.