गॅस सिलिंडरबाबत नवीन नियम

पाईपलाईन गॅस उपलब्ध असल्यास तो सक्तीचा : सवलतीही जाहीर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

ज्या भागांमध्ये पाईप लाईनद्वारे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा उपलब्ध आहे, त्या भागातील घरांनी पाईप लाईनचे कनेक्शन घेणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. हे कनेक्शन न घेतल्यास अशा घरांचा सिलिंडर पुरवठा बंद करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने हा नवा आदेश काढला असून पाईप लाईन उपलब्ध असणाऱ्या भागातील सर्व घरांनी पाईप लाईन कनेक्शन लवकरात लवकर घ्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. हा आदेश पेट्रोलियम विभागाने काढला असून काही सवलतीही जाहीर केलेल्या आहेत.

ही अधिसूचना 24 मार्चला काढण्यात आली आहे. पाईप लाईन गॅस उपलब्ध असणाऱ्या घरांना ही अधिसूचना काढल्यापासून तीन महिन्यांच्या आत पाईप लाईन गॅस कनेक्शन घ्यावे लागणार आहे. अन्यथा त्यांचा सिलिंडर गॅस पुरवठा बंद केला जाण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त घरांनी आणि व्यापारी आस्थापनांनी पाईप लाईन गॅस कनेक्शन घ्यावे, असे केंद्र सरकारचे धोरण आहे, असे स्पष्ट केले गेले.

पीएनजीला प्राधान्य कशासाठी…

भारतात पेट्रोलियमपासून पीएनजीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. तसेच हा गॅस भारत अनेक देशांकडून विकत घेतो. त्यामुळे या गॅसचे स्रोत देशाकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त देशात याच गॅसचा उपयोग स्वयंपाकासाठी आणि इतर कामांसाठी केला जावा, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. सध्या सिलिंडरमधून मिळणारा स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध असला, तरी मध्यपूर्वेतील युद्ध परिस्थितीमुळे त्याच्या पुरवठ्यात खंड पडू शकतो. त्यामुळे जो गॅस भारतातच उत्पादित केला जातो, तो अधिकाधिक घरांनी आणि व्यापारी आस्थापनांनी घ्यावा, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे हा आदेश आहे.

पाईपलाईनचे जाळे विस्तारणार

देशभर गॅस पाईपलाईनच्या जाळ्याचा विस्तार करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. पाईपलाईन घालण्यासाठी अनुमतीही विशिष्ट कालावधीत देण्यात यावी, असा नियम करण्यात आला आहे. या कालावधीत पाईप लाईन घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अनुमती दिली नाही, तर ती दिली आहे, असे गृहित धरुन पाईप लाईनच्या कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. तसेच, अशी पाईप लाईन घालण्यासाठी सध्या आकारण्यात येते, त्यापेक्षा अधिक शुल्क आकारण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. गृह संकुलांची गॅस पाईपलाईशी जोडणी करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. तसेच ‘लास्ट माईल पीएनजी कनेक्शन’ 48 तासांमध्ये देण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या कंपन्या पाईप लाईन घालण्याचे काम करीत आहेत, त्यांनी अनुमती घेतल्यापासून चार महिन्यांच्या आत पाईप लाईनच्या कामाचा प्रारंभ केला पाहिजे. विलंब केल्यास त्यांना दंड केला जाऊ शकतो किंवा अनुमती रद्द होऊ शकते.

सिलिंडरचे प्रमाण कमी करणार

भारतातील जास्तीत जास्त घरांना पाईप लाईनद्वारेच गॅस पुरविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. असे करणे सिलिडर पुरविण्यापेक्षा सुलभ आहे. एकदा पाईप लाईन घातली की तिच्यातून सहजगत्या अनेक दशकांपर्यंत गॅसचा पुरवठा केला जाऊ शकतो. पाईप लाईनद्वारे मिळणारा गॅस अधिक सुरक्षित असतो. तसेच त्याचा पुरवठा करण्यासाठी खर्चही कमी येतो. असा पुरवठा अखंड केला जाऊ शकतो. या लाभांमुळे केंद्र सरकारने पाईप लाईन्सचा विस्तार देशभर करण्यासाठी एक व्यापक योजना हाती घेतली असून येत्या पाच वर्षांमध्ये ती पूर्ण केली जाईल.

Comments are closed.