पाकिस्तानमधील नुकसानीचा नवीन व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
भूसेना दिनानिमित्त प्रसारित, अनेक वायुतळ उद्ध्वस्त
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताच्या सेनेने भूसेना दिनाचे निमित्त साधून, ‘सिंदूर अभियाना’त पाकिस्तानच्या झालेल्या प्रचंड हानीचा नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ आणि पाकिस्तानचे अनेक वायुतळ भारताने कसे उद्ध्वस्त केले, हे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. पाकिस्तानने भारतासमोर त्यावेळी कसे गुढघे टेकले होते. याची प्रचिती या व्हिडीओतून येते. देशात गुरुवारी भारतीय सैन्याने आपला भूसेना दिन साजरा केला. या निर्मित देशाच्या विविध सेनातळांवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त ‘सिंदूर अभियान’ या कार्यवाहीसंबंधीचा नवा आणि अधिक स्पष्ट व्हिडीओ भारतीय सेनेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारताच्या वायूदलाने आणि भारताच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळ आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध वायूतळ यांच्यावर कसा अचूक आणि विनाशकारी हल्ला चढविला होता, हे या नव्या व्हिडीओमधून अधिक स्पष्टपणे आणि निर्विवादपणे दिसून येत आहे.
9 दहशतवादी तळांवर हल्ला
भारताने ‘सिंदूर अभियाना’त पाकिस्तानच्या विविध भागात स्थापन करण्यात आलेल्या 9 महत्वाच्या दहशतवादी तळांवर अचूक आणि वेगवान हल्ला चढविला होता. हे तळ पाकिस्तानच्या आतील भागांमध्ये असूनही ते भारताच्या तडाख्यातून वाचू शकले नव्हते. भारताच्या या हल्ल्यांमध्ये किमान 100 दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षक ठार झाले होते. हे हल्ले 7 मे 2025 च्या रात्री चढविण्यात आले होते. त्यानंतर 8 मे, 9 मे आणि 10 मे या दिवशीही भारताने पाकिस्तानच्या महत्वाच्या वायूतळांवर ब्राम्होस आणि अन्य क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने मारा केला होता. हा मारा इतका अचूक आणि प्रभावी होता, की हे सर्व तळ पूर्णत: निकामी करण्यात भारताला यश आले होते. पाकिस्तानला अद्यापही या तळांची दुरुस्ती करणे जमलेले नाही. हे तळ आजही कार्यान्वित करण्यात आल्याचे दिसत नाही.
वायुसंरक्षण रडारही उद्ध्वस्त
भारताने ‘सिंदूर अभियान’ साकारून केवळ पाकिस्तानचे वायूतळ उद्ध्वस्त केले असे नाही, तर पाकिस्तानच्या वायुदलाचा आधार असलेली संरक्षण रडार यंत्रणाही मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केली आहे. ही रडार यंत्रणाही कार्यरत करणे अद्याप पाकिस्तानला जमलेले नाही. पाकिस्तानच्या वायूदलाची फार मोठी हानी भारताच्या या कार्यवाहीत झालेली आहे. पाकिस्ताननेही अप्रत्यक्षरित्या ही हानी मान्य केलेली आहे. तरीही पाकिस्तान या युद्धात आपलाच विजय झाल्याचा खोटा दावा करुन आपल्याच जनतेची घोर फसवणूकही चालविली असल्याचे दिसून येत आहे.
भारताची पाकिस्तानला भीती
भारताने अत्यंत अचूकपणे साधलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानला भारताची भीती बसल्याचे दिसून येत आहे. भारताला आजही पाकिस्तान धमक्या देत असला, तरी त्या पोकळ आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते. ‘सिंदूर अभियान’ केवळ तीन दिवस चालले. पण त्यामुळे पाकिस्तानची लक्षात राहील अशी हानी झाली. त्यामुळे पाकिस्तान आणखी एकदा विषाची परीक्षा पाहणार नाही, असे तज्ञांना वाटते. ‘सिंदूर अभियान’ अद्याप थांबलेले नसून ते केवळ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पाकिस्तानने पुन्हा भारताची कळ काढण्याचा प्रयत्न केला, तर या कार्यवाहीचा द्वितीय टप्पा हाती घेण्यात येईल, असा इशारा भारताने दिला आहे.
अनेक मार्गांनी पाकिस्तानची कोंडी
- ‘सिंदूर अभियान’ हा पाकिस्तानची कोंडी करण्याचा केवळ एक मार्ग
- भारताने ठेवला आहे सिंधू जलकरार स्थगित, जलकोंडीही केली जाणार
- सीमांवर भारताची भूसेना कोणत्याही क्षणी आक्रमणासाठी पूर्णत: सज्ज
Comments are closed.