New Year 2025 Mumbai Police preparations for 31st celebrations


मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे 13 हजार पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांनाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये 8 अतिरिक्त आयुक्त, 29 पोलीस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2184 पोलीस अधिकारी तसेच 12 हजार 048 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. (New Year 2025 Mumbai Police preparations for 31st celebrations)

हेही वाचा : Ladki Bahin : अंगणवाडी सेविकांचे काही चुकले का, लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता का मिळत नाही 

– Advertisement –

या व्यतिरिक्त वाहतूक पोलीस, सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शाखा, एटीएस, बीडीडीएस विशेष पथक, राज्य राखीव दल आणि जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लघंन आणि ड्रंक ऍण्ड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहेत. विविध आस्थापने आणि गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकीकडे मुंबईकरांनी जय्यत तयारी केली असताना शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. शहरामधील विविध रेल्वे स्थानके, शासकीय-निमशासकीय इमारती, मंदिर, गर्दीच्या ठिकाणी, विशेषतः गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ, गोराई चौपाटी, पवई तलाव आणि इतर धार्मिक ठिकाणी तसेच राजकीय नेत्यांचे पुतळे, मॉल, गर्दीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवण्यात आली आहे.

समुद्रकिनारी लाखोच्या संख्येने मुंबईकर नवीन वर्षांच्या स्वागतासाठी येत असल्याने तिथे जास्तीत जास्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्बशोधक आणि नाशक पथक यांच्याकडून घातपात विरोधी तपासणी तसेच समुद्रकिनारी बोटीच्या सहाय्याने सतर्क गस्त घालण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी विशेष नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन तसेच शहरातील हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. मद्यप्राशन करुन होणारे वाद, महिलांची छेडछाड तसेच विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला छेडछाड विरोधी पथकाची केली आहे. मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, रॅश ड्रायव्हिंग करणे अशा घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तळीरामांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यासाठी जागोजागी नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार आहे.



Source link

Comments are closed.