ममदानी यांनी कुराणावर हात ठेवून घेतली शपथ

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधानंतरही न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेले हिंदुस्थानी वंशाचे जोहरान ममदानी यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर कार्यभार स्वीकारला. बुधवारी मध्यरात्री 12 वाजता कुराणावर हात ठेवून त्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. ममदानी हे न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ठरले.
मॅनहॅटन शहरातील ऐतिहासिक सब वे स्टेशनवर हा शपथविधी सोहळा झाला. ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.’ त्यानंतर ममदानी यांना सिटी हॉलमधील एका भव्य सार्वजनिक सोहळय़ात पुन्हा एकदा औपचारिक शपथ देण्यात आली.
आम्हाला तुझी काळजी! ममदानींचे उमर खालिदला पत्र
दिल्ली दंगलीच्या कटाच्या आरोपाखाली तिहार जेलमध्ये असलेला जेएनयू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला ममदानी यांनी पत्र लिहिले आहे. उमरची मैत्रीण बनोज्योत्स्ना लाहिरी हिने हे पत्र ‘एक्स’वर शेअर केले आहे. ‘प्रिय उमर, कटुतेची तू केलेली व्याख्या आणि कटुतेचा आपल्यावर परिणाम होऊ न देणे किती महत्त्वाचे आहे याचा मी अनेकदा विचार करतो. तुझ्या आई-वडिलांना भेटून आनंद झाला. आम्हा सर्वांनाच तुझी काळजी आहे,’ असे ममदानी यांनी पत्रात म्हटले आहे.
उमरचे आई-वडील नुकतेच अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांनी ममदानी यांच्यासह अनेक लोकांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर ममदानी यांनी हे पत्र लिहिल्याचे बोलले जात आहे. ममदानी यांनी यापूर्वी खालिद यांच्या बाजूने जाहीर भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या आधी 2023 साली न्यूयॉर्कमध्ये ‘हाऊडी डेमोव्रॅसी’ हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात ममदानी यांनी खालिदने तुरुंगातून लिहिलेले पत्र वाचून दाखवले होते.

Comments are closed.