VIDEO: W W W W W…254 वर्षांत पहिल्यांदा घडले! न्यूझीलंडच्या गोलंदाजाने 5 चेंडूत घेतल्या 5 विकेट्स

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्रेट रँडेलने रविवारी (८ मार्च) सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून खेळताना नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्च्या विरुद्ध प्लंकेट शील्ड सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने पाच चेंडूत पाच विकेट्स घेतल्या. २५४ वर्षांच्या प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने मागील वर्षी एका स्थानिक टी२० सामन्यात पाच चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या. तो व्यवसायिक सामन्यात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला होता. झिम्बाब्वेच्या केलिस नधलोवू याने २०२४मध्ये स्थानिक अंडर १९ टी२० सामन्यात पाच चेंडूत पाच विकेट्स घेतल्या होत्या.
सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत ३७३ धावा केल्या. त्यानंतर नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्चा डाव सुरू असताना ब्रेटने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूत हेनरी कूपरला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूत जीत रावलला तंबूचा रस्ता दाखवला. नंतर त्याने जो कार्टरला गोल्डन डकवर बाद करत हॅट्ट्रीक पूर्ण केली. पुढील दोन चेंडूंमध्ये रॉबर्ट ओ डॉनेल आणि क्रिस्टियन क्लार्क यांच्या विकेट्स घेतल्या.
ब्रेटने त्याच्या चौथ्या षटकातही दोन विकेट्स घेतल्या. त्याने बेन पोमारे आणि स्कॉट कुगेलाइनला बाद केले. यामुळे त्याने ४ धावा देत तब्बल ७ विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याने आणखी तीन षटके टाकली, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.
ब्रेटच्या जबरदस्त गोलंदाजीने नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्चा डाव ८२ धावसंख्येवरच संपुष्टात आला. त्याने त्याच्या ९ वर्षाच्या कारकिर्दीत ३८ प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. त्यामध्ये सध्या केलेली त्याची ही कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. त्याने या सामन्यात २५ धावांत ७ बळी घेतले.
१७७२ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या अधिकृत प्रथम श्रेणी सामन्यापासून आणि आतापर्यंत केलेल्या कामगिरीचे रेकॉर्ड्स आहेत. त्यामध्ये कोणत्याही खेळाडूने पाच चेंडूत पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केलेली नव्हती. आता ब्रेट रँडेलने नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
Comments are closed.