तिसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यापूर्वी न्यूझीलंडला धक्का! दोन प्रमुख वेगवान गोलंदाज संघाबाहेर

भारत अ आणि न्यूझीलंड अ (India A vs New Zealand A) यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम अनधिकृत कसोटी सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील दोन वेगवान गोलंदाज सायमन कीन (Saiman Kean & Frezer sheet) आणि फ्रेझर शीट दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाहीत. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने अनिर्णित राहिले होते.

मागील सामन्यादरम्यान सायमन कीनला मांडीच्या मागील स्नायूला दुखापत झाली, तर फ्रेझर शीटच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू पुढील तीन ते चार आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहेत. दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर ते आपल्या स्थानिक संघांकडून खेळण्यासाठी पुनरागमन करण्याची तयारी करतील.

फ्रेझर शीटने भारत अ विरुद्धच्या पहिल्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये प्रभावी गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यात त्याने 2, तर दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे, सायमन कीनने पहिल्याच सामन्यात 5 विकेट्स घेत दमदार कामगिरी केली होती. मात्र, दुखापतीमुळे आता या दोघांनाही तिसऱ्या सामन्याला मुकावे लागणार आहे.

याशिवाय, न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, बेन लिस्टरदेखील सरावादरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत ब्रेट रँडेल आणि जॅक गिब्सन हे संघात कायम राहतील. तर डॅनरू फर्न्स यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.

भारत अ विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम अनधिकृत कसोटी सामन्यासाठी जॅक गिब्सन आणि ब्रेट रँडेल न्यूझीलंड अ संघाचा भाग असतील. तसेच, टॉप ऑर्डरमधील फलंदाज हेन्री निकोल्सची गेल्या आठवड्यात न्यूझीलंडच्या मुख्य वनडे संघात निवड झाली आहे. त्यामुळे टिम रॉबिन्सन न्यूझीलंड अ संघासोबत कायम राहणार आहे.

दरम्यान, भारतीय संघालाही धक्का बसला आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishbh Pant) स्नायूंच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने शनिवारपासून लिंकन येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंड अ विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात तो खेळू शकणार नाही. त्याच्या जागी टी-20 संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा (Tilak verma) भारत अ संघात दाखल झाला आहे.

मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी म्हणजे अनुभवी कसोटीपटू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे आगामी सामन्यांच्या तयारीसाठी मैदानात उतरणार आहेत.

न्यूझीलंड अ संघ : आदि अशोक, मॅट बॉयल, मॅक्स चू, डॅनरू फर्न्स, डीन फॉक्सक्रॉफ्ट, जॅक गिब्सन, कर्टिस हीफी, राइस मारियू, जेरोड मॅकी, कॅम पॉल, डेल फिलिप्स, ब्रेट रँडेल आणि टिम रॉबिन्सन.

Comments are closed.