NZvsSA: दुसऱ्या टी20 मध्ये न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय, मालिका केली बरोबरीत

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. यामध्ये पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकत १-० अशी आघाडी घेतली होती. न्यूझीलंडने मंगळवारी (१७ मार्च) झालेल्या दुसऱ्या सामन्यात ६८ धावांनी विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत केली आहे. डेवॉन कॉनवेच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला १७६ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते.
हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कॉनवेने टॉम लॅथमच्या साहाय्याने पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर न्यूझीलंडच्या दोन विकेट्स लवकरच पडल्या. लॅथम ११ धावा आणि टीम रॉबिनसन एक धाव करत बाद झाले. कॉनवे मात्र खेळपट्टीवर टीकून राहिला.
कॉनवेने नंतर निक केलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. कॉनवे ६० धावा करत बाद झाला. तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या १२४ झाली होती. त्यानंतर कोल मॅककॉन्ची आणि जोश क्लार्कसन यांनी सातव्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे न्यूझीलंडने २० षटकात ६ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट्स वियान मुल्डरने (२) घेतल्या. जेराल्ड कोएट्जी, ओटनील बार्टमन, केशव महाराज आणि जॉर्ज लिंड यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत राहिले. त्यांच्याकडून जॉर्ज लिंड याने सर्वाधिक ३३ धावा केल्या. त्याने १२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारले. न्यूझीलंडकडून बेन सियर्स आणि लोकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.
तसेच न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनरनेही २ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी केल्याने दक्षिण आफ्रिकेचे सर्व विकेट्स १५.३ षटकात १०७ धावसंख्येवरच पडल्या.
कॉनवे या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच ठरला. या मालिकेतील पुढील सामना २० मार्चला खेळला जाणार आहे. पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने जिंकला होता.
Comments are closed.