न्यूझीलंडचा विजय अन् पाकिस्तानचे पॅकअप, बांगलादेशचेही साखळीतच आव्हान संपुष्टात

हिंदुस्थानने कालच एका बाणात दोन शिकार केल्या होत्या. आज रचिन रवींद्रच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशचा पराभव करून त्यावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशचा 5 विकेटनी धुव्वा उडवीत न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आणि बांगलादेशसह गतविजेत्या पाकिस्तानचेही साखळीतच पॅकअप झाले. यजमान पाकिस्तानवर सलग दोन पराभवांमुळे साखळीतच बाद होण्याची नामुष्की ओढावल्यामुळे अवघ्या देशात मातम पसरला आहे. ‘अ’ गटातून कालच हिंदुस्थानने उपांत्य फेरी गाठली होती, तर आज उपांत्य फेरी गाठणारा न्यूझीलंड दुसरा संघ ठरला.

बांगलादेश आजचा सामना जिंकावा म्हणून पाकिस्तानात अल्लाहकडे साकडे घालण्यात आले होते. बांगलादेशच्या 237 धावांच्या आव्हानाचा न्यूझीलंडने 46.1 षटकांत 5 फलंदाज गमावत फडशा पाडला. तस्कीन अहमदने पहिल्याच षटकात विल यंगला भोपळाही फोडू न देता त्रिफळाबाद करून बांगलादेशला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेला केन विल्यम्सनही 5 धावांवरच माघारी परतला. त्याला नाहीद राणाने यष्टीमागे मुस्तफिकरकरवी झेलबाद करून न्यूझीलंडची 2 बाद 15 अशी दुर्दशा केली. मात्र, त्यानंतर दुसरा सलामीवीर डेव्हन काॅन्वे (30) व आलेला रचिन रवींद्र यांनी तिसऱया विकेटसाठी 57 धावांची भागीदारी करीत न्यूझीलंडला सावरले.

मुस्तफिझुर रहमानने काॅन्वेचा त्रिफळा उडवून न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. मग रचिन व टॉम लॅथम यांनी चौथ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी करीत न्यूझीलंडला विजयाच्या दारात आणले. रचिनने 105 चेंडूंत 12 चौकार व एका षटकारासह 112 धावांची खेळी केली. ही त्याची चौथी शतकी खेळी ठरली. रिशाद हुसैनने रचिनला बदली खेळाडू परवेझ हुसैनकरवी झेलबाद करून बांगलादेशला चौथे यश मिळवून दिले. त्यानंतर टॉम लॅथमही 76 चेंडूंत 3 चौकारांसह 55 धावा करून धावबाद झाला. मग ग्लेन फिलिप्स (21) व मायकेल ब्रेसवेल (11) यांनी न्यूझीलंडच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

नजमुलची अर्धशतकी झुंज

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 9 बाद 236 धावसंख्या उभारली. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसैन शाण्टोने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. तळाला जाकेर अली (45) व रिशाद हौसेन (26) यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला म्हणून बांगलादेशला सवा दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. सलामीवीर तंझीद हसन (24) धावांची वीशी ओलांडणारा फलंदाज ठरला. मेहदी हसन (13), तौहिद हृदोय (7), मुस्तफिकर रहीम (2) व महमुदुल्लाह (4) हे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. त्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी तब्बल 22 वाईड बॉल टाकून बांगलादेशला अवांतर धावाही बहाल केल्या. विल ओ’रुर्पने आघाडीच्या फळीला धक्का देत बांगलादेशला बॅक फुटवर ढकलले, तर मायकेल ब्रेसवेलने मधल्या फळीला भगदाड पाडल्याने बांगलादेशला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. ओ’रुर्पने 2, तर ब्रेसवेलने 26 धावांत 4 फलंदाज बाद केले. त्याचीच कामगिरी सामनावीर ठरली.

Comments are closed.