आयपीएल 2026 दरम्यान खेळली जाणार वनडे आणि टी20 मालिका, वेळापत्रक जाहीर

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम २८ मार्चपासून सुरु होत आहे. क्रिकेटविश्वातील ही सर्वात मोठी लीग असून अनेक मोठ-मोठे खेळाडू यामध्ये सहभागी होतात. आयपीएल सुरु असताना कोणताही क्रिकेट बोर्ड सहसा आंतरराष्ट्रीय सामन्याचे नियोजन करत नाही. यंदा मात्र बांग्लादेश क्रिकेट बोर्डने वनडे आणि टी२० मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

न्यूझीलंडचा पुरुष क्रिकेट संघ १७ एप्रिलपासून बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये १७ ते २३ एप्रिलमध्ये तीन वनडे सामने खेळले जातील. पहिले दोन सामने ढाका आणि अंतिम सामना चट्टोग्राम येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. टी२० मालिकेतील पहिला सामना २७ एप्रिल आणि दुसरा सामना २९ एप्रिलला खेळला जाणार असून हे दोन्ही सामने चट्टोग्राममध्ये खेळले जाणार आहेत. तिसरा सामना २ मे ला ढाकामध्ये खेळला जाईल.

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा उपविजेता न्यूझीलंड सध्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे बांग्लादेशने घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका २-१ अशी जिंकली आहे.

या दौऱ्याचा आयपीएलवर परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. बांग्लादेशचे एकही खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार नाही. तसेच न्यूझीलंड या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंना पाठवू शकतो, कारण यादरम्यान त्यांचे अनेक अनुभवी खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असणार आहेत.

बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका-
पहिली वनडे – १७ एप्रिल, मीरपूर, ढाका
दुसरी वनडे – २० एप्रिल, मीरपूर, ढाका
तिसरी वनडे – २३ एप्रिल, चट्टोग्राम

टी२० मालिका-
पहिला टी२० सामना – 27 एप्रिल, चट्टोग्राम
दुसरा टी२० सामना – 29 एप्रिल, चट्टोग्राम
तिसरा टी२० सामना – २ मे, मिरपूर ढाका.

Comments are closed.