आश्चर्य… जन्माला येताच बाळाने दाखवले ‘दात’, कळवा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथे जन्माला आलेल्या नवजात बाळाला चक्क दोन दात असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पाहून डॉक्टरांसह सर्वच जण अवाक झाले आहेत. मात्र बाळाच्या आरोग्याची काळजी घेत डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया करून दात काढून बाळाला संभाव्य धोक्यापासून सुरक्षित केले.

सामान्यतः नवजात बाळाचे दात ६ महिन्यांनंतर येतात. मात्र काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये बाळ जन्माला येतानाच एक किंवा अधिक दात घेऊन जन्मते. वैद्यकीय भाषेत यांना ‘नेटल टीथ’ असे म्हटले जाते. अशा प्रकारचे दात प्रत्येक २ हजार ते ३ हजार ५०० जन्मांमागे केवळ एका बाळामध्ये आढळतात. विशेष म्हणजे सुमारे ८५ टक्के प्रकरणांमध्ये खालच्या जबड्यातील पुढचे दात अधिक प्रभावित असतात. त्या बाळाला अशाच प्रकारे पुढचे दोन दात आले होते, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी दिली.

श्वसननलिकेत अडकण्याचा होता धोका
चिमुकल्याला दातांमुळे स्तनपानमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच दात अतिशय सैल असल्याने ते श्वसननलिकेत जाण्याचा धोका निर्माण होऊ शकत होता. याशिवाय जिभेला जखम होण्याची शक्यता होती. त्यामुळे बाल दंततज्ज्ञ डॉ. श्रेया बापट, दंत विभागाच्या प्राध्यापक डॉ. पल्लवी खळे, डॉ. धैर्यशील एडके, डॉ. दिव्या मोकाशी तसेच बालरोग विभागाच्या प्राध्यापक डॉ. शैलजा पोतदार यांच्या संपूर्ण टीमने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.