'आयुष्यातील सर्वात मोठी चूक', हसीन जहांबद्दल मोहम्मद शमीचं मोठं विधान
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला यंदाच्या आशिया कप 2025 साठी भारतीय संघात स्थान मिळालं नाही. मात्र या दरम्यान त्याने लोकप्रिय टीव्ही शो ‘आप की अदालत’ मध्ये उपस्थित राहून आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी उघडपणे चर्चा केली. शमी त्याच्या पत्नी हसीन जहांसोबतच्या नात्यात आलेल्या तणाव, चालू असलेल्या न्यायालयीन वाद आणि स्वतःच्या मानसिक संघर्षाबद्दल स्पष्टपणे सांगितले.
2014 मध्ये शमीचे हसीन जहां हिच्याशी लग्न झाले होते. परंतु केवळ चार वर्षांतच दोघे वेगळे राहू लागले. हसीन जहांने 2018 मध्ये शमीविरोधात घरगुती हिंसेची तक्रार दाखल केली होती. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शमी म्हणाला, “ आयुष्य तुम्हाला खूप काही शिकवतं. मी मानतो की ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. मी कोणालाही दोष देत नाही. ते माझं नशीब होत.”
कौटुंबिक वाद असूनही खेळात सातत्य राखणे किती कठीण होते याबाबत शमी म्हणाला, “हे खूप खटकतं. जेव्हा तुम्ही स्पर्धात्मक खेळ खेळता तेव्हा दोन्ही बाजूंना लक्ष द्यावं लागतं, इथे काय घडतंय आणि तिथे काय घडतंय. दबाव प्रचंड असतो.”
वाद मिटवण्यासाठी काही प्रयत्न केले का, असा प्रश्न विचारला असता शमी म्हणाला, “कोणालाच घरात भांडण नको असतं. विशेषतः जेव्हा तुम्ही आपल्या देशासाठी सेवा करत असता, तेव्हा अनावश्यक तणाव नको असतो. प्रयत्न झाले होते, पण आता निर्णय समोरच्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे धैर्य राखावं लागतं.”
शो मध्ये शमीने सर्वात मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की, कठीण काळात त्याने तीन वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला होता. “मनात विचार आला होता, पण देवाचे आभार की तसं काही झालं नाही. नाहीतर मी विश्वचषक खेळू शकलो नसतो. या खेळाने मला खूप नाव दिलं आहे. लोकांचं प्रेम, त्यांचा आधार मला आठवला आणि मी ठरवलं. सगळं विसरून पुन्हा खेळावर लक्ष केंद्रित करायचं.”
Comments are closed.