…तर डाव्या हाताने गोलंदाजीही करेन; ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी संजू सॅमसनचा ठाम पवित्रा! पाहा नेमकं काय म्हणाला…

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या टी20 संघात संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे आणि पाच टी20 सामने खेळले जाणार आहेत. आशिया कप 2025 मध्ये संजू सॅमसनचा संघात समावेश होता आणि त्याने चांगली कामगिरी केली होती. ओमानविरुद्धच्या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब पटकावत त्याने आपली क्षमता सिद्ध केली होती.

मात्र या स्पर्धेत संजूच्या फलंदाजीच्या क्रमात सातत्याने बदल करण्यात आले. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत तो सलामीला खेळला, पण गिल पुनरागमन करताच संजूला मधल्या फळीतील स्थानी हलवण्यात आले. यावर संजूने कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही, उलट त्याने आपली भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली.

CEAT क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्समध्ये बोलताना संजू म्हणाला, “जर तुम्ही मला 9व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं, किंवा लेफ्ट-आर्म स्पिन गोलंदाजी करायला सांगितलं, तरीही मी ते देशासाठी आनंदाने करीन.”

संजूने यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 10 वर्षं पूर्ण केली आहेत. मात्र या दशकात त्याला केवळ 40 सामनेच खेळायला मिळाले. तरीही तो सकारात्मक राहिला आहे. तो पुढे म्हणतो, “हे आकडे सगळं काही सांगत नाहीत. पण मी ज्या संघर्षातून गेलो, त्याने मला मजबूत बनवलं. आता मी बाहेरच्या आवाजाऐवजी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकतो.”

भारताच्या टी20 संघात सूर्यकुमार यादव कर्णधार असून, शुभमन गिल उपकर्णधार आहे. संजू सॅमसनकडून या मालिकेत ठोस कामगिरीची अपेक्षा आहे.

Comments are closed.