इंग्लंडमध्ये स्मृती मानधनाचा झंझावात, परदेशी सलामीवीर म्हणून केली 'ही' कामगिरी!!

भारताच्या स्मृती मानधनाने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. ती इंग्लंडमधील सर्वात यशस्वी परदेशी सलामीवीर ठरली आहे. म्हणजेच इंग्लंड दौऱ्यातील जगातील सर्वात यशस्वी ओपनर ठरली आहे. मंगळवारी चेस्टर ली स्ट्रीटवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तिने ही कामगिरी केली.

भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव करून मालिका 2-1 अशी जिंकली. यापूर्वी, भारतीय महिलांनी त्यांच्याच भूमीवर टी-20 मालिकेत पहिल्यांदाच इंग्लंडचा पराभव केला.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मानधनाने 54 चेंडूत 45 धावा केल्या. अशाप्रकारे, तिने इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून 715 धावा केल्या आहेत, जे आतापर्यंत कोणत्याही परदेशी सलामीवीराने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. तिने भारताच्या पूनम राऊतला मागे टाकत हा पराक्रम केला आहे.

मानधनाने प्रतीका रावलसोबत डावाची सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. 29 वर्षीय मानधनाने इंग्लंडमध्ये एकदिवसीय स्वरूपात भारताची सर्वात यशस्वी ओपनर देखील बनली आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 318 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 84 चेंडूत 102 धावांची जलद आणि शानदार शतकी खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्जने अर्धशतक झळकावले. मानधना व्यतिरिक्त हरलीन देओलनेही 45 धावा केल्या. रिचा घोषने फक्त 18 चेंडूत 38 धावांची तुफानी नाबाद खेळी केली ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

विजयासाठी 319 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड 49.5 षटकांत फक्त 305 धावाच करू शकला. कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट फक्त 2 धावांनी शतक झळकावू शकली नाही. एम्मा लॅम्बने 68 आणि अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्सने 44 धावा केल्या. भारताने हा निर्णायक एकदिवसीय सामना 13 धावांनी जिंकला आणि एकदिवसीय मालिकाही 2-1 अशी जिंकली.

Comments are closed.