महाराष्ट्रात ओला दुष्काळ नाही! महायुती सरकारची उफराटी भूमिका; पूरग्रस्तांसाठी सवलतींची घोषणा; मदतीच्या किटमधून तेल, मीठ, चहा-साखर, मसाला गायब
अतिवृष्टीने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेते आणि संसार वाहून गेले. शेतजमिनी खरडून गेल्या. डोळ्यात अश्रू घेऊन मदतीच्या अपेक्षेने डोळे लावून बसलेल्या बळीराजाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून दिलासादायक काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र महायुती सरकारने महाराष्ट्रात ओला दुष्काळ नाही अशी उफराटी भूमिका घेत शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत देण्याबाबतही काहीच निर्णय घेतला गेला नाही. पूरग्रस्तांना सवलतींची घोषणा केली, मात्र त्यांना देण्यात येणाऱया मदतीच्या किटमधून तेल, मीठ, चहा, साखर, मसालाच गायब करून टाकला.
बळीराजाच्या अश्रूंचा महापूर
गेल्या 15 दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाडय़ातील लातूर, धाराशीव, नांदेड, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकंदर पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 60 लाख हेक्टर जमिनीवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे तिथे पोहोचता येत नव्हते, त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत नुकसानीची संपूर्ण माहिती मिळेल. खरडून गेलेली जमीन, विहिरी आणि घरे यांची पडझड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीच्या भरपाईबाबत धोरण तयार करून पुढील आठवड्यात त्याची घोषणा करू, असे त्यांनी पुढे सांगितले.
दिल्लीने नुकसानभरपाईसंदर्भात पूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारला मदत प्रस्तावासाठी आकडे पाठवावे लागतात. मात्र अजूनही हे आकडे जमा करण्याचे काम सुरू आहे. अशा स्थितीत केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता तत्काळ मदत सुरू केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.
तांदूळ दिले पण शिजवायचे कुठे!
संसार वाहून गेला. घर राहिले नाही. त्यामुळे शेतकऱयांना नाइलाजास्तव रानात राहावे लागत आहे. सरकार किंवा इतर संस्थांकडून मिळणाऱया मदतीवरच त्यांची गुजराण होत आहे. सरकारकडून पूरग्रस्तांना मदतीची किट वाटली जात आहेत; पण त्यात फक्त 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 3 किलो तुरीची डाळ इतक्याच वस्तू आहेत. चूलच नाही तिथे कच्चा गहू आणि तांदूळ शिजवायचा कुठे, डाळ कुठे बनवायची असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे. स्वयंपाकाची भांडी अद्याप सरकारकडून पोहोचलेली नाहीत. डाळ बनवायला तेल, मीठ, मसालाच किटमध्ये नाही. चहा प्यावासा वाटला तर किटमधून चहा पावडर आणि साखरच गायब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी हा शब्दच मॅन्युअलमध्ये नाही. तरीही दुष्काळ पडतो तेव्हा देण्यात येणाऱया सर्व सवलती शेतकऱ्यांना लागू करण्यात येऊन दिवाळीपूर्वी त्यांना मदत देण्याचा प्रयत्न राहील.
पूरग्रस्तांच्या खात्यात आजपासून 10 हजार
पूरग्रस्त भागातील शेतशिवारांचे पंचनामे करण्यात येत आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्या पूरग्रस्तांच्या खात्यात 1 ऑक्टोबरपासून प्रत्येकी 10 हजार रुपये मदत जमा करण्यात येणार आहे.
ई-केवायसीची अट शिथिल
गेल्या काही महिन्यांत सातत्याने अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. लाखो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सरकारने ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी 2215 कोटी रुपये वितरित करणे सुरू केले आहे. ई-केवायसीची अट शिथिल करून हे पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले.
Comments are closed.