पाऊस परतला, जोरदार बरसला!
अनेक दिवस सुट्टीवर गेलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील पाच दिवस मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. रायगड जिल्ह्याच्या काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईसह काही जिह्यांना सावधानतेचा इशारा दिला असून रायगडला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
दक्षिण ओडिशा-उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. परिणामी, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 20 ऑगस्टपर्यंत राज्याच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. मराठवाडा, विदर्भातही पाऊस धुमशान घालण्याची शक्यता आहे.
रायगड, घाटमाथ्यावर धो-धो पाऊस कोसळणार
रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाट परिसरात धो-धो पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Comments are closed.