सीडीएस चौहान यांचा निकोबार दौरा
वायुतळावर धावपट्टीचे केले उद्घाटन
वृत्तसंस्था/ निकोबार
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी अंदमान आणि निकोबार बेटसमुहात भारतीय वायुदलाच्या कार निकोबार वायुतळावर अपग्रेड करण्यात आलेल्या धावपट्टीचा शुभारंभ केला आहे. सीडीएस चौहान हे शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता निकोबार बेटावर पोहोचले, जेथे अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल अजय कोचर आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
सीडीएस चौहान यांनी भारतीय वायुदलाच्या कार निकोबार वायुतळावर अपग्रेड करण्यात आलेल्या धावपट्टीचे उद्घाटन केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. निकोबार जिल्ह्यात स्थित कार निकोबार श्री विजय पुरम (आधीचे नाव पोर्ट ब्लेयर) पासून सुमारे 535 किलोमीटर अंतरावर आहे आणि 2004 च्या त्सुनामीत येथे सर्वाधिक नुकसान झाले होते.
मलक्का सामुद्रधुनीवर थेट नजरt
अपग्रेड करण्यात आलेल्या धावपट्टीद्वारे पूर्व आघाडीला आणखी मजबुती मिळेल, कारण येथून मलक्का सामुद्रधुनीवर थेट रणनीतिक नजर ठेवली जाऊ शकते, जो आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यासाठी एक महत्त्वपूर्ण सागरी मार्ग आहे. यामुळे भारतीय वायुदलाला वेगाने हवाई अभियान राबविण्याची क्षमता वाढविता येणार आहे. विमानांच्या सुरळीत प्रवासासाठी एप्रनचा विस्तार करण्यात आला आहे आणि ही सुविधा वायुदलाला कमी वेळेत दीर्घ पल्ल्याचा फायरिंग अभ्यास करण्यास मदत करणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
भांडार सुविधा
सीडीएसचा हा दौरा राष्ट्रीय सुरक्षेसाठी अंदमान आणि निकोबार बेटांचे रणनीतिक महत्त्व, ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणावर लक्ष केंद्रीत करणे आणि क्षेत्रात सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला दर्शवितो. सीडीएस चौहान यांनी एका भांडार सुविधेचेही उद्घाटन केले असून त्सुनामी स्मारकाचा दौरा केला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
Comments are closed.