मुद्रा – क्रिकेटमय सारं…

क्रिकेटचं वेडच आयुष्यभराची ओळख ठरावी यासाठी जिद्द बाळगणारे निलेश भोसले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त सचिव पदापर्यंतचा हा प्रवासत्यांच्याच शब्दात.

क्रिकेटची आवड अगदी शाळेपासून. त्यावेळी फक्त आणि फक्त क्रिकेट हेच ध्येय असायचे. व्यावसायिक खेळायचं की नाही, यात करीअर करायचे की नाही हे असे प्रश्न कधी पडलेच नाहीत; पण याच क्रिकेटने माझं आयुष्य कायमस्वरूपी व्यापलं आणि सावरलंही.

सुरुवातीला एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट संघटनेच्या उन्हाळी शिबिरांमधून सराव सुरू केला. त्यानंतर एमआयजी क्रिकेट क्लबमधून खेळू लागलो. तिथे माझे एमआयजीचे पहिले प्रशिक्षक रामनाथ पारकर  होते. आधी मी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होतो; पण क्रिकेटच्या वेडापायी दादरमधील शारदाश्रम शाळेत प्रवेश घेतला आणि क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्याकडे शिकू लागलो. त्याच वर्षी मुंबईसाठी अंडर 15 वयोगटात खेळलो आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळायला सुरुवात झाली असं मी म्हणेन. याच कारणासाठी घाटकोपरच्या झुणझुणवाला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथे अंडर 17, अंडर 19 वयोगटात खेळलो. त्यावेळी मी बारावीला असताना आम्ही पहिल्यांदा ज्युनियर कॉलेज फायनल खेळलो होतो. समोर कीर्ती महाविद्यालय होते. तो सामना अजूनही आठवतो. समोर सचिन तेंडुलकर, अमोल मुजुमदार, मनोज जोगळेकर असे दिग्गज खेळाडू होते. हा क्रिकेटचा प्रवास आजतागायत सुरूच आहे.

क्रिकेट खेळत असताना एका टप्प्यावर जेव्हा स्थिरावण्याची वेळ आली तेव्हाही क्रिकेटनेच हात दिला. युनियन बँकेद्वारे क्रिकेट  खेळाडू म्हणून 1995 मध्ये बँकिंग सेवेत सामावून घेण्यात आले आणि आजतागायत ही सोबत सुरू आहे. याच काळात चंद्रकांत पंडित यांनी अंधेरीत क्रिकेट अ‍ॅकेडमी सुरू करण्याचे ठरविले. माझाही या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या, ‘क्रिकेटप्लेयर’चं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलांसाठी काहीतरी करण्याचा मानस होता. ज्या खेळाने आपल्याला इतकं काही दिलं त्याचे दायित्व म्हणून प्रशिक्षक ही जबाबदारी निभावण्याची संधी या अ‍ॅकेडमीच्या कामाद्वारे मला लाभली. ‘चंद्रकांत पंडित क्रिकेट क्लिनिक’ या अ‍ॅकेडमीत 99 साली मी प्रशिक्षक म्हणून सुरुवात केली. पुढे 2003 साली एमसीए, बीसीसीएचा लेव्हल 1 चा कोर्स पूर्ण केला. पुढे 2005 मध्ये लेव्हल 2 चा कोर्स पूर्ण केला असं करत नॅशनल अॅकेडमीचा लेव्हल 2 चा प्रशिक्षक इथपर्यंत पोहोचलो. या काळात अ‍ॅकेडमीमध्येही चांगले क्रिकेट खेळाडू तयार झाले. यात प्रशिक्षक म्हणून माझाही सहभाग होता. शिवम दुबे, जागृत मेहता, जयदीप परदेशी असे चांगले खेळाडू तेव्हा अॅकेडमीत होते.

कोविड काळात ही अ‍ॅकेडमी बंद झाली; परंतु माझे काम सुरूच होते. याच काळात एमसीए (मुंबई क्रिकेट संघटना) मध्ये मी कोचिंग कमिटीत होतो, सिलेक्टरही होतो. 2011 ते 2017 या काळात अंडर 14 व अंडर 16 सिलेक्शन कमिटीचा अध्यक्ष होतो. मुंबई विद्यापीठासाठी सिलेक्टर होतो. असं करत 2022 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अपेक्स कौन्सिल मेंबरमधून मी निवडणूक लढलो आणि निवडून आलो. या तीन वर्षांच्या काळात अमोल काळे, आताचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सी. एस. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोष्टी शिकता आल्या. 2025 साली जेव्हा पुन्हा निवडणुका झाल्या तेव्हा संयुक्त सचिव म्हणून निवडून आलो. आता अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व अपेक्स कौन्सिलचे इतर सदस्य उन्मेष खानविलकर, अरमान मलिक यांच्या सहकार्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काम प्रामाणिकपणे पुढे चालवत आहोत.

क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाही. इथे टीम अपेक्षित असते. त्यामुळे मी किंवा चंद्रकांत पंडित आम्ही कोणीही पर्सनल कोचिंग कधीच केले नाही. अ‍ॅकेडमीद्वारे आम्ही ज्या ज्या मुलांना प्रशिक्षण दिले ती मुलं रणजी, मुंबई ए-वन ग्रुपसाठी खेळली आणि याचा मला अर्थातच अभिमान आहे. पुढे मी जेव्हा मुंबईचा सिलेक्टर होतो तेव्हा पृथ्वी शॉ, अरमान जाफर, सर्फराज, साईराज पाटील, हरजीत तामोरे हे खेळाडू होते, ज्यांनी क्रिकेटविश्वात अत्यंत चमकदार कामगिरी केली.

क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करत असतानाच या क्षेत्रातील प्रशासकीय बाजूदेखील उलगडली आणि यात पुढे जावं, अधिक जाणून घ्यावं या उद्देशाने एमसीएमध्ये कार्यरत झालो. क्रिकेटचे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि कोचिंग हे दोनही वेगळे भाग आहेत आणि ते जाणून घेतले पाहिजेत. मुंबई क्रिकेट आणि मुख्यत्वे हा खेळ अधिकाधिक व्यापक बनेल, अधिक प्रभावी व प्रवाही राहील यासाठी एमसीए नितांतपणे काम करीत आहे. आमच्या समितीतील दिग्गजांचा अनुभवही या खेळाला अधिक विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहे. अध्यक्ष अजिंक्य नाईक, सी.एस. नाईक, उन्मेष खानविलकर, आमदार जितेंद्र आव्हाड अशा अनुभवी मंडळींचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन मोलाचे आहे. अपेक्स कौन्सिलमधील मिलिंद नार्वेकर, विकास रेपाळे, नदीम मेनन, भूषण पाटील या मंडळींच्या प्रदीर्घ अनुभवाने एमसीए उज्वल वाटचाल करीत आहे. या दिग्गज मंडळींसोबत काम करताना नवीन काहीतरी शिकायला मिळते.

संयुक्त सचिव या पदाची जबाबदारी सांभाळताना आपण मुंबई क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्यास बांधील आहोत याचं भान मी कायम राखतो. एक खेळाडू म्हणून ती माझी जबाबदारी आहे आणि त्याच अनुषंगाने प्रामाणिक प्रयत्न होत असतात. यात क्लब क्रिकेट, शाळा व महाविद्यालयांचे क्रिकेट क्लब, समिती व इतर क्रिकेटशी संलग्न संस्थांना याचा लाभ कसा मिळेल यासाठी एमसीएद्वारे अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम, स्पर्धा राबविल्या जातात. मुलींसाठीही तितकेच अनुकूल वातावरण राहील यासाठी प्रयत्न केले जातात. या महानगरीने ‘क्रिकेटचा देव’ आपल्याला दिला. आता याच छायेखाली इथे अशी क्रिकेटमधील रत्नं तयार करण्याची जबाबदारी आमची म्हणजेच एमसीएची आहे ही जाणीव सतत जागृत असते.

शाळा, महाविद्यालयं ते खासगी क्लब अगदी सगळीकडे क्रिकेटबाबत उत्साही वातावरण असते. क्रिकेट हा आपल्या सगळ्यांचा लाडका खेळ. हा खेळ जिवंत ठेवण्याचे काम प्रत्येक क्रिकेटवेड्या खेळाडू, रसिकाने केले. ते कायम ठेवण्याचे आणि अधिक गुणवत्तापूर्ण राखण्याची जबाबदारी मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे कायम पार पाडली जाईल यात शंका नाही.

शब्दांकन : शुभांगी बागडे

[email protected]

Comments are closed.