९ कोटींचे कर्ज प्रकरण ही केवळ इगोची लढाई; चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादव काय म्हणाला?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्याने या वादावर आपली बाजू मांडली. हे प्रकरण आता केवळ पैशांचे न राहता अहंकाराची लढाई बनल्याचे राजपालने यावेळी सांगितले.

राजपाल यादवने २०१० मध्ये ‘अता पता लापता’ हा चित्रपट बनवण्यासाठी मुरली प्रोजेक्ट्स नावाच्या कंपनीकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे तो हे कर्ज वेळेत फेडू शकला नाही. यादरम्यान त्याने दिलेले काही चेक बाऊन्स झाले, ज्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. या प्रकरणी त्याला तुरुंगवासही सोसावा लागला असून सध्या तो १.५ कोटी रुपयांच्या जामिनावर बाहेर आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राजपालने सांगितले की, ज्या कंपनीकडून त्याने पैसे घेतले होते, तो व्यवहार पूर्णपणे विश्वासावर आधारित होता. “हा घरगुती मामला होता, त्यामुळे मी कोणत्याही वकीलाचा सल्ला घेतला नाही किंवा कागदपत्रे नीट वाचली नाहीत. मी डोळे झाकून सह्या केल्या, हीच माझी मोठी चूक ठरली,” असे तो यावेळी म्हणाला.

समोरच्या व्यक्तीवर निशाणा साधताना राजपाल म्हणाला, “त्या व्यक्तीला पैशांची नाही तर इज्जतीची भूक आहे. त्याला वाटते की मी ५ कोटींसाठी त्याच्या पाया पडावे. जर विषय फक्त पैशांचा असता, तर मी २०१३ पासूनच पैसे द्यायला तयार होतो.” राजपालने स्पष्ट केले की, या व्यवहाराबद्दल त्याच्या पत्नीलाही काहीच माहिती नव्हती. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ५ कोटींच्या बदल्यात ८ कोटी रुपये देण्याचे ठरले होते, परंतु चित्रपटने केवळ १ कोटींची कमाई केली आणि संपूर्ण गणित बिघडले. राजपाल यादवचे वकील भास्कर उपाध्याय यांनीही यावेळी त्यांची बाजू मांडली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्च रोजी होणार आहे.

Comments are closed.