Asian Games 2026 – क्रिकेटमधील दुर्मिळ क्षण… संघात एकाच आडनावाचे 9 खेळाडू; निकालापेक्षा ‘प्लेइंग-11’चीच क्रीडा जगतात चर्चा

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात एक अत्यंत दुर्मिळ अन् रंजक घटना पाहायला मिळाली आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात ओमानच्या संघाला 41 धावांनी पराभवाचा स्वीकारावा लागला असला, तरी या सामन्याच्या निकालापेक्षा ओमानच्या ‘प्लेइंग-11’चीच क्रीडा जगतात तुफान चर्चा रंगली आहे. या सामन्यात ओमानच्या संघात एकाच अल बलुशी आडनावाचे तब्बल 7 खेळाडू एकाच वेळी मैदानावर उतरले होते, तर त्यांच्या संपूर्ण संघात या आडनावाच्या 9 खेळाडूंचा समावेश आहे.

निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे सुफियान मेहमूदच्या नेतृत्त्वाखालील ओमानचा संघ हाँगकाँगविरुद्ध मैदानात उतरला होता. या सामन्यात ओमानच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये मोहम्मद अल बलुशी, शुऐब अल बलुशी, जुबैर अल बलुशी, वहीद अल बलुशी, ईसा अल बलुशी, नवीद अल बलुशी आणि फारिस अल बलुशी या खेळाडूंचा समावेश होता. म्हणजेच मैदानातील 11 पैकी 7 खेळाडू एकाच आडनावाचे होते. याशिवाय राखीव खेळाडूंमध्ये वसीम अल बलुशी आणि कैस अल बलुशी यांचा समावेश असल्याने संपूर्ण ओमानच्या 15 जणांच्या ताफ्यात अल बलुशी एकत्र आले आहेत.

विशेष म्हणजे, या सामन्यात ओमानसाठी डावाची सुरुवात करणाऱ्या पहिल्या चारही फलंदाजांचे आडनाव अल बलुशीच होते. मोहम्मद, शुऐब, जुबैर आणि वहीद यांनी अनुक्रमे क्रमांक 1 ते 4 क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र हाँगकाँगच्या अचूक मारासमोर ओमानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शुऐब अल बलुशीने सर्वाधिक 20 धावा केल्या, तर ईसा अल बलुशीने 7 धावांचे योगदान दिले. मोहम्मद 2, वहीद 1 आणि जुबैरला शून्य धावांवर बाद झाला.

फलंदाजीत अपयश आले असले तरी गोलंदाजीत मात्र अल बलुशी बंधूंनी आपली चमक दाखवली. मोहम्मद, शुऐब आणि नवीद या तिघांनी मिळून हाँगकाँगचे महत्त्वाचे 5 फलंदाज बाद केले. मोहम्मद अल बलुशी ओमानचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने अवघ्या 17 धावा देत 3 बळी मिळवले.

दरम्यान, मोहम्मद अल बलुशीने चालू वर्षातच टी-20 पदार्पण केले असून 3 जून 2026 रोजी बहरीनविरुद्ध त्याने 81 धावांची तुफानी खेळी साकारली होती. 30 वर्षीय अष्टपैलू शुऐब अल बलुशीच्या नावावर 117 धावा आणि 4 बळी आहेत. तर नवीद अल बलुशीने सिंगापूरविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यातच 22 धावांत 4 बळी घेण्याची किमया केली होती. वहीद अल बलुशीने याच हाँगकाँग सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण ठेवले. या लढतीत ओमानला पराभव पत्करावा लागला असला, तरी एकाच आडनावाच्या 7 खेळाडूंना मैदानावर उतरवून त्यांनी क्रिकेटच्या इतिहासात नव्या विक्रमाचीच नोंद केली आहे.

Comments are closed.