एसयूव्ही विहिरीत कोसळली एकाच कुटुंबातील 9 जण ठार, दिंडोरीत भयानक अपघात
दिंडोरी येथे शुक्रवारी रात्री मारुती एक्सएल सिक्स एसयूव्ही रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. त्यात इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. यात 7 ते 14 वयोगटातील पाच बहिणी, एका भावाचा समावेश आहे. इंदोरेत शनिवारी दुपारी शोकाकुल वातावरणात या नऊ जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हा कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
दिंडोरीत खासगी क्लासने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनात इंदोरे येथील दरगोडे कुटुंबिय सहभागी झाले होते. स्नेहसंमेलनानंतर रात्री सवादहा वाजता मारुती एक्सएल सिक्स गाडीतून सर्वजण गावी निघाले. या हॉलपासून काही अंतरावर येताच रस्त्यात असलेल्या विहीरीचा चालक सुनील यांना अंदाज आला नाही, नियंत्रण सुटून गाडी विहिरीत कोसळली. कारच्या काचा बंद असल्याने कुणालाही बाहेर पडता आले नाही. अपघात झाल्याचे कळताच रहिवाशी मदतीसाठी धावून आले. मात्र, पाणी जास्त असल्याने, तसेच अंधारामुळे मदतकार्यात अडथळे आले. पोलीस पथकांसह नाशिक, पिंपळगाव, दिंडोरी येथून बचाव पथक, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. गाडीमधून बाहेर पडता न आल्याने गुदमरून सुनील यांच्यासह त्यांची मुलगी राखी ऊर्फ गुणवंती, पत्नी रेश्मा, वहिनी आशा अनिल दरगोडे, त्यांची मुले श्रेयश अनिल दरगोडे, श्रावणी, सृष्टी, माधुरी आणि नाशिक येथे राहणारी पुतणी समृद्धी यांनी प्राण गमावले. या हृदयद्रावक घटनेने इंदोरेसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मंत्री झिरवळ यांना संतप्त नातेवाईकांचा घेराव
विहिरीला संरक्षक भिंत असती तर हा अपघात टळला असता. नऊ निष्पाप जिवांचा बळी गेला नसता. दरगोडे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी सकाळी मंत्री नरहरी झिरवळ दाखल झाले, तेव्हा संतप्त नातेवाईक, ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. या दुर्घटनेला नगरपालिकेचा निष्काळजीपणा जबाबदार आहे, रस्ता विहिरीपर्यंतच पूर्ण केला तेव्हाच संरक्षक भिंतीचे काम का केले नाही, असा संतप्त सवाल केला.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, असे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजवण्याचे निर्देश त्यांनी नगरपालिकेला दिले. यावेळी महाजन यांच्यासह मंत्री दादा भुसे, नरहरी झिरवळ, खासदार भास्कर भगरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदींनी घटनास्थळाची पाहणी केली, कुटुंबीयांचे सांत्वन केले.
विहीरमालकाविरुद्ध गुन्हा
रस्त्याच्या मध्यभागी विहीर असूनही तिला कंपाऊंड केलेले नव्हते, तसेच तिचा कठडा अत्यंत छोटा होता. नगरपालिकेनेही रस्ता काँक्रिटीकरण विहिरीपर्यंतच केलेले होते. विहिरीमुळे भीषण अपघात घडू शकतो याकडे मालकानेही दुर्लक्ष केले, या निष्काळजीपणामुळे दिंडोरी पोलिसांनी विहीरमालक राजेंद्र पर्वतराव राजेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.