फ्रान्सच्या ऐतिहासिक संग्रहालयात चोरी, 7 मिनिटांत 9 मौल्यवान दागिने लंपास

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील ऐतिहासिक लुव्र संग्रहालयात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा भिंत ओलांडून, खिडकीचे गज कटरने कापून चोरट्यांनी संग्रहालयात प्रवेश केला आणि अवघ्या 7 मिनिटांत 9 मौल्यवान दागिने लंपास केले. या घटनेनंतर संग्रहालय तूर्त बंद करण्यात आले आहे.
फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्री राशिदा दाती यांनी या चोरीची माहिती दिली. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 1855 मध्ये बनवण्यात आलेला हिरेजडीत युजनी मुकुट आहे. या मुकुटाचे काही भाग संग्रहालयात पडलेले आढळले. त्यावरून चोरीच्या वेळी हा मुकुट तुटल्याचा अंदाज आहे. चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू असून चोर विदेशी असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.
लुव्रमध्ये सुमारे चार लाख कलाकृती
लुव्र संग्रहालय हे जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे संग्रहालय आहे. येथे अनेक प्रसिद्ध कलाकृती व मौल्यवान वस्तू आहेत. यात मोनालिसा, व्हिनस डिमेलो यांचाही समावेश आहे. संग्रहालयात जवळपास 3 लाख 80 हजार कलाकृती आहेत. त्यातील 35 हजार प्रदर्शनात ठेवल्या जातात. या कलाकृतींची किंमत अब्जावधी पौंड असल्याने संग्रहालयाला कडेकोट सुरक्षा असते. दररोज किमान 30 हजार लोक येथे भेट देतात.
Comments are closed.