दिल्लीत 'निर्भया' प्रकरणाची पुनरावृत्ती झाली
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिल्लीत 4 ऑगस्टच्या रात्री एका 16 वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार घडल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी बसचालक आणि कंडक्टरला अटक केली आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली बस पोलिसांनी जप्त केली आहे. या बसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे.
दिल्लीत पुन्हा एकदा निर्भयासारखे प्रकरण समोर आले असून यामुळे महिलांच्या सुरक्षेवरून गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत. ग्रेटर नोएडापासून दिल्लीच्या काश्मिरी गेटदरम्यान धावणाऱ्या एका स्लीपर बसमध्ये हा गुन्हा घडला आहे. बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर चालक आणि कंडक्टरनेच सामूहिक बलात्कार केला.
पीडित मुलगी मैनपुरी जिल्ह्याची रहिवासी असून ती इयत्ता 11 वीत शिकतेय. ही मुलगी 3 ऑगस्ट रोजी स्वत:च्या घरातून कुणाला न सांगता बाहेर पडली होती. अभ्यासावरून आई रागावल्याने तिने हे पाऊल उचलले होते. नोएडा सेक्टर-63 मध्ये राहणाऱ्या चुलत भावाच्या घरी जाण्याचा विचार तिने केला होता. याकरता ती ग्रेटर नोएडाहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या स्लीपर बसमध्ये चढली होती. बसमध्येच चालक आणि कंडक्टरने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ प्रभावाने चौकशी सुरू केली. दोन्ही आरोपींना अटक करत पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
निर्भया प्रकरण
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीच्या वसंत विहारमध्ये एका धावत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. निर्भयाला मरण्यासाठी रस्त्यावर फेकण्यात आले होते. या घटनेच्या 7 वर्षे 3 महिन्यांनी निर्भयाला न्याय मिळाला होता. निर्भयाचे गुन्हेगार अक्षय ठाकूर, मुकेश सिंह, विनय शर्मा आणि पवन गुप्ता याच्यासह 6 जण होते. यातील रामसिंह नावाच्या आरोपीने तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केली होती. तर एका अल्पवयीनाची सुधारगृहातून मुक्तता करण्यात आली. उर्वरित चारही गुन्हेगारांना 20 मार्च 2020 रोजी पहाटे 5.30 वाजता फासावर लटकविण्यात आले होते.
Comments are closed.