बुधवारी निसार उपग्रह सुरू होणार आहे
इस्रो-नासाची संयुक्त मोहीम :
► वृत्तसंस्था/बेंगळूर
अंतराळाच्या क्षेत्रात भारत लवकरच आणखी एक कामगिरी करणार आहे. पृथ्वीचे अवलोकन करणारा उपग्रह नासा-इस्रो सिंथटिक अपर्चर रडार (निसार)ला जीएसएलव्ही-एस-16 रॉकेटद्वारे 30 जुलै म्हणजेच बुधवारी अंतराळात प्रक्षेपित केले जाणार आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी ही माहिती दिली आहे. निसार या उपग्रहाचे वजन 2,392 किलोग्रॅम असून हा पृथ्वीचे अवलोकन करणार आहे. दुहेरी आवृत्ती सिंथेटिक अपर्चर रडार (नासाचा एल-बॅड आणि इस्रोचा एस-बॅड)सोबत पृथ्वीचे निरीक्षण करणारा हा पहिला उपग्रह असणार आहे.
हा उपग्रह स्वीप एसएआर तंत्रज्ञानाचा वापर करत 242 किलोमीटरची कक्षा आणि उच्च स्थानिक विभेदन क्षमतेसह पृथ्वीचे निरीक्षण करणार असून हे पहिल्यांदाच घडणार आहे. कुठल्याही उपग्रहीय छायचित्राच्या संबंधात उच्च स्थानिक विभेदन क्षमतेचा वापर होतो, ज्यात छायाचित्रात सुक्ष्म तपशीलही स्पष्टपणे पाहिला जाऊ शकतो. या उपग्रहाला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाणार आहे.
740 किलोमीटरच्या उंचीवर होणार प्रक्षेपित
इस्रो आणि नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनकडून (नासा) तयार पृथ्वी अवलोकन उपग्रहाला 30 जुलै रोजी भारतात निर्मित जीएसएलव्ही-एस16 रॉकेटद्वारे अंतराळात पाठविले जाणार आहे. या उपग्रहाला 740 किलोमीटरच्या उंचीवर प्रक्षेपित केले जाईल. हा उपग्रह कुठल्याही हवामानात आणि दिवसरात्र पृथ्वीची छायाचित्रे मिळवू शकतो. भूस्खलनाचा पूर्वाअनुमान, आपत्ती व्यवस्थापनात मदत करणे आणि हवामान बदलावर नजर ठेवण्यासही हा उगप्रह सक्षम असल्याची माहिती इस्रोच्या प्रमुखांनी दिली आहे.
पूर्ण जगासाठी उपयुक्त
हा उपग्रह भारत, अमेरिका आणि पूर्ण जगासाठी उपयुक्त ठरणार आहे. पृथ्वीच्या नैसर्गिक संपदेच्या देखरेखीसाठी हा उपग्रह महत्त्वपूर्ण असल्याचे वक्तव्य नारायणन यांनी केले आहे. तर गगनयान मोहिमेच्या तयारीदाखल व्योममित्र नावाचा ह्यूमनॉइड डिसेंबर महिन्यात अंतराळात पाठविला जाणार आहे. जर ही मोहीम यशस्वी ठरली तर पुढील वर्षी 2 मानवरहित मोहिमा राबविण्यात येतील. तर गगनयान मोहीम मार्च 2027 मध्ये हाती घेण्यात येणार असल्याचे नारायणन यांनी सांगितले आहे.
Comments are closed.