निशांत कुमार यांना बिहारमध्ये मंत्रीपद मिळाले आहे
32 मंत्र्यांनी घेतली शपथ : पंतप्रधान मोदी, नितीश कुमार राहिले उपस्थित
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात गुरुवारी 32 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात संजद अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचाही समावेश आहे. रालोआचे पाच घटक पक्ष भाजप, संजद, एलजेपीआरव्ही, हम आणि आरएलएमच्या प्रतिनिधींना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
पाटण्यातील गांधी मैदानात आयोजित भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) सैयद अता हसनैन यांनी सर्व 32 सदस्यांना मंत्रिपद तसेच गोपनीयतेची शपथ दिली. शपथग्रहण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संजद अध्यक्ष नितीश कुमार आणि रालोआचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहिले.
क्षेत्रीय संतुलनाचा प्रयत्न
सम्राट चौधरी मंत्रिमंडळात निशांत कुमार यांच्यासोबत श्रवण कुमार, अशोक चौधरी, लेसी सिंह यांना स्थान मिळाले. तर भाजपच्या कोट्यातून रामकृपाल यादव, नीतीश मिश्रा, दिलीप जायसवाल या दिग्गजांनी शपथ घेतली. संजदमधून रत्नेश सदा, मदन सहनी आणि शीला कुमारी यांनाही मंत्री करण्यात आले. याचबरोबर श्रेयसी सिंह, मोहम्मद जमा खान आणि लखेंद्र कुमार रोशन या चेहऱ्यांना सामील करत क्षेत्रीय संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोजप-आर, हम आणि आरएलएमने स्वत:चे जुने मंत्री संजय पासवान, संजय सिंह, संतोष कुमार सुमन आणि दीपक प्रकाश कुशवाह यांनाच मंत्रिपदाची संधी दिली आहे.
मागील महिन्यात नितीश कुमार यांनी राज्यसभेवर निवडून गेल्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री झाले होते.
Comments are closed.