Nitesh Rane criticizes Rahul Gandhi Sanjay Raut and Supriya Sule press conference
मुंबई : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत पानिपत झाले. तर, लोकसभेत पराभूत झालेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत न भूतो ना भविष्यती असा विजय मिळाला आहे. त्यावरूनच महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला आहे. याचपार्श्वभूमीवर आज (7 फेब्रुवारी) काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत एकत्र पत्रकार परिषद घेतली. मात्र विरोधकांच्या या पत्रकार परिषदेवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. (Nitesh Rane criticizes Rahul Gandhi Sanjay Raut and Supriya Sule press conference)
राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरच आज पत्रकार परिषदेत प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी म्हटले की, आम्ही महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांच्या निकालांचा अभ्यास केला आहे. या निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाला आहे, असे म्हणायला वाव आहे. विधानसभा निवडणूक 2019 ते लोकसभा निवडणूक 2024 या कालावधीत महाराष्ट्रामध्ये 32 लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली. पण लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 या अवघ्या पाच महिन्यांत 39 नव्या मतदारांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्रात वाढलेल्या 39 लाख मतदारांएवढीच लोकसंख्या हिमाचल प्रदेशची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वाढलेल्या या मतदारांचा तपशील फोटो आणि पत्त्यासह आम्हाला हवा आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातील तसेच विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेली अंतिम मतदार यादी आम्हाला हवी आहे. कारण, हे नवे मतदार कोण आहेत? हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या या पत्रकार परिषदेवर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
थ्री इडियट्सची पत्रकार परिषद झाल्याचे मी ऐकले आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी एकप्रकारे खिल्ली उडवली आहे. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, त्या तीनमधील दोन जण तर ईव्हीएमवर निवडून आले आहे. राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवर मते मिळवून विजय मिळवला आहे. तर संजय राऊत हे आमदारांच्या आशीर्वादाने बॅक डोअरमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे या तिघांची विश्वासार्हता काय आहे? तिघांमध्ये दोघे ईव्हीएमवर निवडून आले असतील तर मग लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही? असे प्रश्न राणे यांनी उपस्थित केले.
नितेश राणे म्हणाले की, लोकसभा निकालानंतर आम्ही रडत बसलो नाही. आम्ही कामाला लागलो. त्यामुळे हरियाणा, महाराष्ट्रात आम्ही सत्ता आणून दाखवली, आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणून आलेल्या खासदारांनी आधी राजीनामे द्यावे आणि नंतर बॅलेट पेपरवर निवडून यावे. मग लक्षात येईल की, त्यांच्या नावासमोर खासदार लागते की माजी खासदार लागते, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा – Fadnavis On Gandhi : ही तर आणखी एका फेक नरेटिव्हची तयारी, काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस –
ईव्हीएमवर निवडून यायचे आणि मग रडत बसायचे
नितेश राणे म्हणाले की, या लोकांचे एवढेच दुःख आहे की, महाराष्ट्रातील सरकार हिंदुत्वाच्या नावाने निवडून आलेले आहे. परंतु आमच्याही काही उमेदवारांना 6, 15 अशी मते मिळाली आहे. तरीही आम्ही तक्रार केली का? पण या लोकांचे असे आहे की, स्वतः ईव्हीएमच्या नावावर निवडून यायचे आणि मग रडत बसायचे. असे रडत बसण्यापेक्षा त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे लोकांची कामे करावी, असा सल्ला नितेश राणे यांनी राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी दिला आहे.
Comments are closed.