Nitesh Rane inaugurated the helpline service launched by Sindhudurg Police for senior citizens


कुडाळ : शिक्षणासाठी तसेच नोकरी निमित्ताने शहरी व ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर होत असल्याने ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा ही महत्त्वाची झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणीच्यावेळी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक व सुरक्षाविषयक समस्यांमध्ये त्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेली ‘हेल्पलाइन सेवा’ कौतुकास्पद आहे. पोलीस दलाने चांगले काम व विनम्र सेवा देऊन जनतेच्या मनातील विश्वास अजून दृढ करावा असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. (Nitesh Rane inaugurated the helpline service launched by Sindhudurg Police for senior citizens)

जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनचे उद्घाटन’ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार दिपक केसरकर, पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लोककलाकार परशुराम गंगावणे, कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष भालचंद्र मराठे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. आज सुरू केलेली हेल्पलाइन सेवा ज्येष्ठांसाठी वरदान ठरणार आहे. ज्येष्ठांनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केल्यास त्यांना तात्काळ मदत मिळेल. त्यामुळे सर्वांनी 7036606060 हा क्रमांक आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवावा. संकटाच्या काळात आपण पोलिसांना फोन केला तर आपल्याला निश्चित मदत मिळते हा विश्वास पोलीस दलाने संपादित करणे व ती विश्वासार्हता जपणे फार महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग पोलिसांवरील जनतेचा विश्वास अशा उपक्रमांमुळे अधिक घट्ट होणार आहे. पोलिसांनी जनतेशी सुसंवाद ठेवावा जेणेकरून पोलीस आणि सामान्य जनता यामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण होईल.

हेही वाचा – Nitesh Rane : हिंदूं मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये यासाठी संघटन निर्माण करणार

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, आपल्या जिल्ह्यासमोर अनेक आव्हाने आहेत. ऑनलाइन गेमिंगमुळे भावी पिढीचे भविष्य अंधकारमय बनत असल्याने हा प्रश्न सोडविणे समाजासमोर आव्हान बनले आहे. ज्येष्ठ नागरिक व भावी पिढीला सुरक्षित ठेवणे हीच आपली गुंतवणूक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘अंमली पदार्थ मुक्त’ जिल्हा बनवायचे आहे. यामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. मोठ्य विश्वासाने पर्यटक आपल्या जिल्ह्यात येतात. पर्यटकांना त्रास होईल असे कृत्य जिल्ह्यात होता कामा नये. काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांनी स्वत:हून कारवाई करावी. या मेळाव्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कायदेविषयक, आर्थिक गुंतवणूकीबाबत, विविध शासकीय योजना, सुरक्षितताविषयक माहिती देखील देण्यात येत असल्याने हा मेळावा कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे म्हणाले की, सिंधुदुर्ग मुंबईपासून लांब असला तरी मुंबई व महाराष्ट्रासाठी हा जिल्हा जवळचा आहे. नोकरीनिमित्त महानगरात गेलेला माणूस निवृत्तीनंतर येथे शांत निवांत वातावरणात येतो. धकाधकीच्या जीवनानंतर येथे स्थिरावलेल्या ज्येष्ठ नागरिक व तरुण पिढी यांच्यात पोकळी निर्माण होते. हीच पोकळी भरून काढण्याचा हा कार्यक्रम आहे. तुमच्या जिल्ह्यात तुमच्यासाठी 24 तास दरवाजा उघडा असलेला हा पोलीस विभाग आहे. तुमच्या प्रत्येक समस्यांसाठी हा हेल्पलाइन नंबर काम करणार आहे येथून जाणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल मध्ये हा नंबर सेव्ह असावा, अशी मी विनंती संजय दराडे यांनी केली.

हेही वाचा – Thane News : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात होणार विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी या मेळाव्यामागील संकल्पना सांगितली. ते म्हणाले की, जेष्ठ नागरिकांना वेळोवेळी आरोग्‍य, सुरक्षा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी मदत मिळत नाही. कौटुंबीक संपत्तीच्या वादामुळेही जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जेष्ठ नागरिकांची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात एक जेष्ठ नागरिक सेल कार्यरत आहे. जेष्ठ नागरिकांच्या समस्या सुटाव्यात त्यांना पोलीसांची व अन्य शासकीय विभागाची मदत मिळावी, त्यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे या व्यापक हेतूने शाश्वत उपाययोजना म्हणून 24 तास कार्यरत असणारी व्हाटस्ॲप व हेल्पलाइन क्रमांकांचे आज मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून पोलीस आणि जेष्ठ नागरिक एकसंघ होऊन उद्भवलेल्या समस्यांचे वेळेत निराकारण करण्याचा आमचा मानस आहे. या हेल्पलाइनशी संपर्क केल्यानंतर जेष्ठ नागरिकांना प्राधान्याने व गतीमान पद्धतीने प्रतिसाद देण्यात येणार. पोलीस विभागाशी संबधित समस्या कायदेशिर मार्गाने सोडविण्यासोबत इतर प्रशासकीय विभागाशी निगडित काही समस्या असल्यास त्या विभागाशी समन्वय ठेवून समस्याचे निराकारण करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.



Source link

Comments are closed.