Nitesh Rane statement that he will form an organization so that no one looks at Hindu temples with a wrong eye
कुडाळ : हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, तसेच मंदिराच्या विरोधात विचार करण्याचीही हिंमत होणार नाही, असे संघटन निर्माण करू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. ते सिंधुदुर्गातील माणगाव (कुडाळ) येथील श्रीदत्त मंदिराच्या सभागृहात श्रीदत्त मंदिर न्यास माणगाव, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती द्वारा आयोजित द्वितीय जिल्हास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’त बोलत होते. (Nitesh Rane statement that he will form an organization so that no one looks at Hindu temples with a wrong eye)
या अधिवेशनाचे उद्घाटन श्रीदत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुभाष भिसे, सचिव दीपक साधले, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सदगुरु सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट व मंदिर महासंघाचे कोअर टीमचे सदस्य अनुप जयस्वाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रणजीत देसाई, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, माणगाव गावच्या सरपंच मनिषा भोसले आणि श्रीदत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवाराचे अध्यक्ष डॉ. वि. म. काळे यांची उपस्थिती होती.
नितेश राणे म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी सरकार आहेत. त्यामुळे यापुढे मंदिरे व हिंदू समाजाला भीती न बाळगता कार्य करता येईल. आपल्या भारतीय संस्कृतीचा मंदिर हा इतिहास आहे. जेव्हा इस्लामिक आक्रमक झाले होते, तेव्हा त्यांनी व्यक्ती किंवा संस्थानवर नाही तर मंदिरांवर हल्ले केले. भारताला मजबूत बनविणारी मंदिरे असल्याने इस्लामिक आक्रमकांनी प्रथम मंदिरांना लक्ष्य करून मंदिरे उद्धवस्त केली होती. मात्र यापुढे हिंदु राष्ट्र निर्मितीत मंदिरे महत्त्वाची भूमिका बजावतील. हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, तसेच मंदिराच्या विरोधात विचार करण्याचीही हिंमत होणार नाही, असे संघटन निर्माण करू असे आश्वासन नितेश राणे यांनी दिले.
मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत लढा चालू ठेवणार
मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी म्हटले की, सेक्युलर म्हणवणारी सरकारे मंदिरांना कोणताही निधी देत नाहीत, धर्माच्या संदर्भात कोणतेही साहाय्य किंवा कार्य करत नाहीत, तर मग त्यांना मंदिरे चालवण्याचा अधिकार कसा काय प्राप्त होतो? हे सेक्युलर राजकारणी कोणतीही मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत. मग हिंदू मंदिरांच्या संदर्भातच हा दुजाभाव का? सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत हा लढा चालू रहाणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक देवस्थानच्या जागा काही जणांच्या माध्यमातून बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकडे जिल्हा प्रशासन व पालकमंत्री नितेश राणे यांनी लक्ष घालून देवस्थानच्या जागा देवस्थानलाच मिळाव्यात यासाठी ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन सुनील घनवट यांनी केले.
मंदिरे ही उपासनेची केंद्र व्हावी
सनातन संस्थेचे सदगुरू सत्यवान कदम म्हणाले की, भारतीय संस्कृतीची नाळ मंदिरांशी जोडलेली आहे. मंदिरे ही समाजासाठी चैतन्याची स्त्रोत आहेत, परंतु आज आपण पाहतो की, मंदिरांचे सरकारीकरण आणि मंदिरातील भ्रष्टाचार यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृतीवर होणारे आघात वेळीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मंदिरे हे आपल्या हिंदूंची आधारशीला आहेत. मंदिरेही धर्मशिक्षणाची केंद्र बनले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आज धर्मशिक्षण नसल्यामुळे आपल्या मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. त्यांचे धर्मांतरण होत आहे. मंदिरातून लहानांसाठी बालसंस्कारवर्ग, किशोरांसाठी सुसंस्कारवर्ग, युवांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि मोठ्यांसाठी सत्संग चालू करणे आवश्यक आहे. यासाठी मंदिरे ही उपासनेची केंद्र बनली पाहिजेत, अशी मागणी सत्यवान कदम यांनी केली.
हेही वाचा – Narendra Modi : पहिल्या विधानसभा अधिवेशनात सीएजीचा अहवाल ठेवणार, मोदींकडून घोषणा
Comments are closed.