आमच्या वेळी विचारांवर निष्ठा होती, आताचे सगळे संधीसाधू; गडकरींनी टोचले कान

आमच्या काळात राजकारण हे विचारांवर आणि निष्ठेवर आधारित होतं. आजचं राजकारण मात्र संधीसाधूपणाकडे झुकलं आहे,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर थेट आणि रोखठोक भाष्य करत इकडून-तिकडे उड्या मारणाऱ्या संधीसाधूंचे कान टोचले आहेत. तसेच आता न लेफ्टीस्ट, न रायटीस्ट फक्त ऑपॉर्च्युनिस्ट (संधीसाधू) असा टोलाही गडकरी यांनी लगावला.

लोकमतच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगत आजच्या आणि पूर्वीच्या राजकारणातील फरक स्पष्ट केला. “आज लोकं पॉवर ओरिएंटेड झाली आहेत. सत्ता कुणाकडे आहे, याचाच विचार जास्त केला जातो. माझं काय होणार, याचा विचार होतो. पण देशाचं काय? समाजाचं काय आणि गरीब माणसाचं काय? हे प्रश्न मागे पडत चालले आहेत,” अशी खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

ऑटो रिक्षातून अनाऊन्समेंट करायचो

आपल्या सुरुवातीच्या काळाची आठवण सांगताना नितीन गडकरी म्हणाले, “मी ज्या काळात काम करायचो, तेव्हा मान-सन्मान, प्रतिष्ठा किंवा जनसमर्थन काहीच नव्हतं. विजयही मिळत नव्हते. मी स्वतः या सगळ्या भागात ऑटो रिक्षातून अनाऊन्समेंट केली आहे. तरीही काम करण्यात वेगळाच आनंद होता, कारण विचारांवरची निष्ठा होती.” ते पुढे म्हणाले, “आम्ही साधू-संन्यासी नव्हतो. पण ज्या संस्कारातून आम्ही आलो, त्यातून विचारांची एक ठाम भूमिका होती. एमर्जन्सीच्या विरोधात अनेक कार्यकर्ते प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम करत होते. अनेक जण जेलमध्ये गेले. त्या लोकांनी आयुष्य दिलं, पण त्याच्या बदल्यात त्यांना काहीही मिळालं नाही. हीच तेव्हाची परंपरा होती.” असं गडकरी म्हणाले.

आजचं राजकारण ‘एक्स्पोर्ट-इम्पोर्ट’सारखं

“आता जी पार्टी सत्तेत आहे, तिच्यात जा. सत्ता गेली की जिची येईल, तिच्यात घुसा, असा मार्ग मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जात आहे. त्यामुळे राजकारणात ‘एक्स्पोर्ट-इम्पोर्ट’ फारच वाढलं आहे.” असं म्हणत नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर टीका करताना रोखठोक भूमिका मांडली.

मोरांचा किस्सा सांगत टोला

“दिल्लीमध्ये माझ्या घराजवळ मोर येतात. मध्ये सोनिया गांधींचा बंगला आहे आणि त्यानंतर मनमोहन सिंग राहत होते. मोरांना कुठलीही पार्टी नव्हती. त्यामुळे ते तिकडून उडत माझ्याकडे यायचे आणि माझ्याकडून तिकडे जायचे. माझ्याकडे सव्वा एकर शेती आहे. रोज खायला मिळतं हे कळल्यानंतर मोर नियमित यायला लागले,” असं म्हणत त्यांनी मूलभूत सुविधा आणि सोयी मिळाल्या की लोक पक्ष बदलतात या गंभीर पण महत्त्वाच्या मुद्याकडे सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

Comments are closed.