नितीन नबीन यांनी पदभार स्वीकारला आहे.

भाजप कार्यकारी अध्यक्ष म्हणून कामाचा शुभारंभ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांनी त्यांच्या कार्याचा शुभारंभ केला आहे. या महत्वाच्या पदावर त्यांच्या नियुक्तीची घोषणा रविवारी करण्यात आली होती. त्यांनी सोमवारी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात आपला पदभार स्वीकारला आहे. नितीन नबीन हे बिहारचे असून ते त्या राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीही आहेत. ते वयाने कमी असले तरी, अनुभवी पक्षसंघटक असून आतापर्यंत त्यांनी 5 वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सर्व समाजघटकांशी सौहार्दसंबंध हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्या आहे. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाच्या मुख्यालयात शानदार कार्यक्रम करण्यात आला.

बिहार हे कार्यक्षेत्र असलेल्या नबीन यांची थेट भारतीय जनता पक्षाच्या कार्याध्यक्षपदी होणे, हे राजकीय क्षेत्रात आश्चर्यकारक मानले जात आहे. तथापि, भारतीय जनता पक्षाला असे आश्चर्याचे धक्के देण्याची सवय आहे. नबीन यांची नियुक्ती विशिष्ट उद्देशाने करण्यात आली असावी, असे अनुमान व्यक्त होत आहे.

सर्वात तरुण वयाचे कार्याध्यक्ष

सर्वात तरुण पक्षाध्यक्ष नितीन नबीन हे 45 वर्षांचे आहेत. त्यामुळे जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाने त्यांच्या नियुक्तीची घोषणा रविवारी केल्यानंतर तो राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. विशिष्ट उद्देशाने त्यांची नियुक्ती करण्यात आली असावी, असे अनेक राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यांच्या निवडीचे कारण हळूहळू स्पष्ट होत आहे. ते जगतप्रकाश न•ा यांच्यास्थानी निवडले गेले आहेत.

चाकोरीबाहेरची निवड

चाकोरीबाहेरचे निर्णय घेणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कायैशैलीचे वैशिष्ट्या आहे. पण हे निर्णय निश्चित विचार करुन घेतलेले असतात, असे आजवर दिसून आले आहे. नितीन नबीन हे भारतीय जनता पक्षाचे मागच्या पिढीतील नेते नबीन किशोर सिन्हा यांचे पुत्र असून पाटणा क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. अनेक वर्षे ते बिहारच्या मंत्रिमंडळात राहिले असून अनेक विभाग त्यांनी हाताळले आहेत. तसेच, पक्षाने सोपविलेले प्रत्येक संघटनात्मक उत्तरदायित्वही त्यांनी निभावलले आहे. 2023 मध्ये त्यांची नियुक्ती छत्तीसगडचे प्रभारी म्हणून करण्यात आली होती. तेथे त्यांनी काँग्रेसचे भूपेश बघेल सरकार निवडणुकीत पाडवून दाखवून आपले संघटना कौशल्य सिद्ध केले. पक्षनेतृत्वाचा विश्वास त्यांनी मिळविल्याचे पहावयास मिळते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी छत्तीसगडमध्ये प्रभारीपदी राहून पक्षाला 11 पैकी 10 जागांवर पक्षाला विजयी करण्यात हातभार लावला होता.

निवडीशी पश्चिम बंगालचा संबंध

येत्या पाच महिन्यांमध्ये चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश येथे विधानसभा निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालची निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्वाची आहे. नितीन नबीन हे कायस्थ समाजाचे असून पश्चिम बंगालमध्येही या समाजाची लोकसंख्या मोठी असल्याचे दिसून येते. या समाजाची मते पश्चिम बंगालमध्ये आकर्षित करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हे त्यांच्या नियुक्तीचे रहस्य असल्याचे बोलले जाते.

पक्षाध्यक्षपदही मिळणे शक्य

सध्या जरी नितीन नबीन यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी झाली असली, तरी पुढे जाऊन भविष्यात ते पक्षाचे पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष होणे त्यांना शक्य आहे. आगामी काळात ते पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कशी कामगिरी करतात, त्यावर त्यांना पूर्णवेळ अध्यक्षपद मिळणार की नाही, हे निर्धारित होईल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

तामिळनाडू, आसाम प्रभारींची नियुक्ती

भारतीय जनता पक्षाचे मावळते कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी तामिळनाडू आणि आसाम या राज्यांसाठी विधानसभा निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली आहे. तामिळनाडूसाठी केंद्रीय व्यापार मंत्री पियुश गोयल हे प्रभारी असून केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल आणि केंद्रीय प्रवासी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची या राज्यासाठी सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर आसाम राज्यासाठी ओडीशातील नेते बैजयंत पांडा यांची नियुक्ती केली गेली.

Comments are closed.