नितीन नबीन हे भाजपचे कार्याध्यक्ष आहेत.
बिहार सरकारमध्ये मंत्री अन् पाचवेळा आमदार : अध्यक्ष निवड होईपर्यंत सांभाळणार पक्षाचे नेतृत्व
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजकारणात अनेकदा चकित करणारे निर्णय घेणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिला आहे. पक्षाने बिहारमधील मातब्बर नेते आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे नितिन नबीन यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. एका युवा नेत्यापसून संघटनेच्या सर्वोच्च स्तरापर्यंतचा त्यांचा हा प्रवास पाहता भाजप आता पूर्णपणे ’नेक्स्ट जेन’ नेतृत्वावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे स्पष्ट होते. भाजपची यापूर्वीची कार्यपद्धती पाहता 45 वर्षीय नितिन नबीन यांनाच निवडणूक प्रक्रिया राबवून पक्षाध्यक्ष पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता दाट आहे.
नितिन नबीन यांची सर्वात मोठी कामगिरी ही 2023 मधील छत्तीसगड विधानसभा निवडणूक आहे. नितिन नबीन यांना छत्तीसगड भाजपचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले होते, तेव्हा राज्यात काँग्रेसचे भूपेश बघेल सरकार अत्यंत मजबूत मानले जात होते. परंतु नबीन यांनी तेथे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत बूथस्तरावर सुक्ष्म व्यवस्थापन केले. महतारू वंदन योजनेसारख्या रणनीतिंना प्रचाराच्या केंद्रस्थानी आणल्याने काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला भाजपला भेदता आला होता. या विजयामुळे नितिन नबीन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आाि अमित शाह यांचे विश्वासू ठरले होते.
वारसा अन् निष्ठा
नितिन नबीन हे भाजपच्या विचारसरणीला वाहून घेतलेल्या परिवाराशी संबंधित आहेत. दिग्गज भाजप नेते आणि पाटण्याचे 7 वेळा आमदार राहिलेले नवीन किशोर सिन्हा यांचे ते पुत्र आहेत. पित्याच्या निधनानंतर नितिन यांनी त्यांचा वारसा सांभाळला, परंतु कधीच घराणेशाहीचा शिक्का स्वत:वर बसू दिला नाही. त्यांनी स्वत:च्या क्षमतेने स्थान निर्माण केले. बिहारमध्ये पथनिर्माण मंत्री म्हणून ‘नितिन गडकरी’ स्टाइलमध्ये त्यांनी केलेल्या कामाचे मोठे कौतुक झाले होते.
युवा चेहरा अन् ऊर्जा
भाजप आता 2029 आणि त्यानंतरच्या काळासाठी नवे नेतृत्व तयार करू पाहत आहे. नितिन नबीन हे युवा, आक्रमक असून नव्या पिढीच्या विचारांची त्यांना जाणीव आहे. भाजयुमोचे ते राष्ट्रीय महामंत्री राहिले असून युवांना पक्षाशी जोडण्याचे त्यांचे कसब अद्भूत असल्याचे बोलले जाते.
संघटन अन् सरकारमधील अनुभव
अत्यंत कमी वयातच नितिन नबीन यांच्याकडे संघटन अन् सरकार दोन्हींचा मोठा अनुभव आहे. बिहार सरकारमध्ये ते पथनिर्माण मंत्री असून आमदार म्हणून त्यांनी पाटण्यातील बांकीपूर यासारख्या महत्त्वपूर्ण मतदारसंघाला भाजपचा अभेद्य गड म्हणून कायम राहिले आहे. या मतदारसंघात त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा तसेच पुष्पम चौधरी यांच्यासारख्या हायप्रोफाइल उमेदवारांना पराभूत पेले आहे.
वादांपासून दूर ‘स्वच्छ प्रतिमा’
राजकारणात अनेक वर्षे सक्रीय राहूनही नितिन नबीन यांची प्रतिमा निष्कलंक राहिली आहे. लो-प्रोफाइल राहून काम करण्यावर ते विश्वास ठेवतात. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कधीच आरोप झालेला नाही. भाजपला सर्वोच्च पदासाठी अशाच स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्याचा शोध होता.
कायस्थ अन् शहरी मतपेढीवर पकड
नितिन नबीन हे कायस्थ समुदायाशी संबंधित असून हा भाजपचा हक्काची मतपेढी मानला जातो. हिंदीभाषिक शहरी भागांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. जातीय समीकरणे साधण्यासोबत ते ‘सबका साथ’युक्त प्रतिमा बाळगून आहेत. बिहारमध्ये पक्षसंघटन मजबूत करणे, छत्तीसगडसारख्या अवघड राज्यात भाजपला सत्तेवर आणण्याचे आव्हानात्मक कार्य त्यांनी यापूर्वी करून दाखविले आहे.
नड्डा यांची जागा घेणार
मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाने जगतप्रकाश नड्डा यांना आरोग्यमंत्री केले होते. तेव्हापासून नव्या पक्षाध्यक्षाचा शोध घेतला जात होता. नड्डाहे 2020 मध्ये पक्षाचे अध्यक्ष झाले होते. पक्षाध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये समाप्त झाला होता. तेव्हापासून त्यांना पदाकरता मुदतवाढ मिळाली होती. आता नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होईपर्यंत नबीन हे या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
संघटनेचा चांगला अनुभव
नितीन नबीन यांनी कर्मठ कार्यकर्ता म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नितिन नबीन यांच्याकडे संघटनेचा चांगला अनुभव असून त्यांनी जनआकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनतीने काम केले आहे. नितीन नबीन यांची खास ओळख म्हणजे त्यांचा विनम्र स्वभाव आणि तळागाळाशी जोडलेले राहणे आहे. केवळ पदांपुरती मर्यादित राहणारे नेते म्हणून नव्हे तर थेट जनतेदरम्यान जात काम करण्यावर त्यांचा विश्वास आहे. याचमुळे संघटन आणि सर्वसामान्य लोकांदरम्यान त्यांची स्वीकारार्हता निर्माण झाली आहे. पक्षाला संघटन आणि जनतेदरम्यान सेतूप्चे काम करणाऱ्या अशाच नेत्यांची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी.
Comments are closed.