नितीशकुमार राज्यसभेत, मुलगा होणार उपमुख्यमंत्री?

बिहारच्या राजकारणात मोठा उलटफेर शक्य

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राज्यसभेवर पाठविले जाऊ शकते. नितीशकुमारांनी राज्यसभा उमेदवारी अर्जासाठी तयार केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नितीशकुमार हे 16 मार्चनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात. 16 मार्च रोजी राज्यसभा निवडणूक होईपर्यंत ते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार आहेत.

याचदरम्यान रालोआच्या सर्व आमदारांना पाटण्यात बोलाविण्यात आले आहे. मागील वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत 89 जागा जिंकत भाजपने स्वत:चा दबदबा कायम केला होता. तर मुख्यमंत्री नितीश कुमारांचा संजद 85 जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर राहिला होता. रालोआच्या विजयात चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष, जीतनराम मांझी यांचा हम आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमचेही योगदान राहिले.

पुढील मुख्यमंत्री कोण होणार?

बिहारच्या सत्तेत भाजपचा दबदबा अधिक असल्याचे स्पष्ट आहे. याचमुळे नितीशकुमार यांच्यानंतर राज्याची धुरा भाजपकडे जाणार आहे. असे घडल्यास बिहारच्या राजकारणाला नवे वळण मिळणार आहे, कारण दीर्घकाळानंतर भाजपचा नेता बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषविणार आहे.

निशांत कुमार यांना पद

नितीशकुमार यांचे पुत्र निशांत यांना राज्यात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. त्यांना बिहारचे उपमुख्यमंत्री केले जाण्याची शक्यात आहे. नितीशकुमार हे सध्या बिहार विधानसभेचे सदस्य आहेत. नितीशकुमार यांना राज्यसभेवर पाठविण्यात आल्यास बिहार विधानसभा सदस्यत्व आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास तो तांत्रिक स्वरुपात पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. याचमुळे पद रिक्त झाल्यावर सत्तारुढ आघाडी नव्याने स्वत:चा नेता निवडणार आहे.

Comments are closed.