नितीश कुमार रेड्डीचं भारतात जल्लोषात स्वागत, ढोल-ताशांच्या आवाजानं दुमदुमलं विमानतळ; VIDEO पाहा

बॉर्डर-गावस्कर मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील बहुतेक खेळाडू मायदेशी परतले आहेत. गुरुवारी (9 जानेवारी) नितीश कुमार रेड्डी त्याच्या मूळ गावी विशाखापट्टणम येथे पोहोचला. यावेळी त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला 1-3 असा दारुण पराभव पत्कारावा लागला. टीम इंडियाला 10 वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकता आली नाही. मात्र ही मालिका नितीश रेड्डीसाठी चांगली होती. त्याला पदार्पणाच्या मालिकेत पाचही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यानं 37.25 च्या सरासरीनं 298 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश होता. हे शतक मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात आलं होतं. नितीश रेड्डी याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिलं शतक होतं. यावेळी त्याचं कुटुंबीयही स्टेडियममध्ये उपस्थित होतं. रेड्डीनं या मालिकेत आपल्या शानदार फलंदाजीनं सर्वांचं मन जिंकलं. याशिवाय त्यानं गोलंदाजीतही 4 विकेट्स घेतल्या.

गुरुवारी नितीश रेड्डी विशाखापट्टणम विमानतळावर पोहचला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. यावेळी ढोल-ताशांचे आवाज सर्वत्र ऐकू येत होते. रेड्डीच्या गळ्यात फुलांचा मोठा हार घालून त्याला एका उघड्या जीपमधून विमानतळाबाहेर नेण्यात आलं. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

नितीश रेड्डी आता इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत खेळताना दिसू शकतो. ही मालिका 22 जानेवारी रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यानं सुरू होईल. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. या मालिकेतही रेड्डी आपला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी या अष्टपैलू खेळाडूची संघात निवड होते की नाही हे पाहणं बाकी आहे. त्यानं अद्याप भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही.

हेही वाचा –

केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही! बीसीसीआयने का घेतला मोठा निर्णय?
सुनील गावस्करांची भविष्यवाणी, रोहितनंतर हा खेळाडू होणार भारताचा कर्णधार
जसप्रीत बुमराह या अटीवरच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार, फिटनेस अपडेट जाणून घ्या

Comments are closed.