भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान नितीश कुमार रेड्डीची हॅट्ट्रिक! टी20 सामन्यात धडाकेबाज कामगिरी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (SMAT) नितीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) मध्य प्रदेशविरुद्ध हॅट्ट्रिक घेत आंध्र प्रदेशला चांगली सुरुवात करून दिली. आंध्र प्रदेशचा संघ प्रथम फलंदाजी करताना फक्त 112 धावांवर गारद झाला होता. अशा परिस्थितीत, रेड्डीच्या हॅट्ट्रिकमुळे मध्य प्रदेशचा टॉप ऑर्डर विस्कळीत झाला आणि आंध्र प्रदेशला सामन्यात पुन्हा संधी मिळाली. मात्र, त्यानंतरही आंध्र प्रदेशला हा सामना जिंकता आला नाही.

डीवाय पाटील कॉलेज ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात मध्य प्रदेशचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टिरक्षक फलंदाज श्रीकर भरतने 31 चेंडूंमध्ये 39 धावांची खेळी केली, परंतु दुसरा सलामीवीर आश्विन हेब्बार याला खातेही उघडता आले नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेला शाइक रशीद देखील शून्यावर बाद झाला.
त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या नितीश कुमार रेड्डीने भरतसोबत 50 धावांची भागीदारी केली. रेड्डीने 25 धावा केल्या, पण ही भागीदारी तुटल्यानंतर आलेले फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. आंध्र प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना केवळ 112 धावा केल्या.

मध्य प्रदेशसाठी 113 धावांचे लक्ष्य सोपे होते, परंतु नितीश कुमार रेड्डीच्या हॅट्ट्रिकमुळे हा सामना आंध्र प्रदेशसाठीही चुरशीचा बनला. रेड्डीने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हर्ष गावळी (5 धावा) याची विकेट घेतली. हे मध्य प्रदेशची पहिली विकेट होती. पुढच्याच चेंडूवर त्याने नवीन फलंदाज हरप्रीत सिंग भाटियाला झेलबाद केले, आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रेड्डीने कर्णधार रजत पाटीदारला बोल्ड करत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

नितीशच्या हॅट्ट्रिकनंतर मध्य प्रदेश संघावर दबाव वाढला होता. लहान लक्ष्य असूनही त्यांच्यावर पराभवाचे संकट घोंगावत होते. यानंतर व्यंकटेश अय्यर देखील 22 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
त्यानंतर ऋषभ चौहान आणि राहुल बाथम यांनी 73 धावांची भागीदारी रचून संघाला विजयाच्या जवळ आणले. मध्य प्रदेशने 17.3 षटकांमध्ये लक्ष्य गाठून 4 विकेट्सने विजय मिळवला.

Comments are closed.