नितीश कुमार गुरुवारी शपथ घेणार आहेत

शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी येणे शक्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, पाटणा

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने प्रचंड विजय प्राप्त केल्यानंतर, आता या राज्यात सरकार स्थापनेची हालचाल वेगाने केली जात आहे. येत्या गुरुवारी नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी होणार आहे. हा कार्यक्रम शानदार पद्धतीने करण्याच्या दृष्टीने प्रशासन सज्जता करीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक पाटणा येथे पार पडली असून त्यात नितीश कुमार यांची पुन्हा विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ते येत्या गुरुवारी मुख्यमंत्रीपदी शपथबद्ध होतील. त्यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला.

त्याग विनम्र

पाटणा येथे राज्य मंत्रिमंडळाची विद्यमान विधानसभेतील अखेरची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी आपल्या मंत्रीमंडळाचे त्यागपत्र राज्यपाल अरीफ मोहम्मद खान यांना सादर केले आहे. राज्यपालांनी त्यांनी पुढील व्यवस्था होईपर्यंत पदाभार हाती ठेवण्याची सूचना केली आहे. नितीश कुमार यांच्या मंत्रीमंडळात कोणाचा समावेश होणार, या संबंधी आता उत्सुकता व्यक्त होत आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय

बिहारची राजधानी पाटणा येथे राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीचा प्रारंभ सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आला. ही बैठक साधारणत: एक तास चालली. या बैठकीत मंत्रिमंडळाचे त्यागपत्र राज्यपालांना सोपविण्याचा अधिकार नितीश कुमार यांना देण्यात आला. या बैठकीला सर्व विद्यमान मंत्री उपस्थित होते.

निर्वाचित प्रतिनिधींची सूची सादर

या घडामोडींपूर्वी रविवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विनोद सिंग गुंजियाल यांनी नव्या बिहार विधानसभेच्या सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींची सूची राज्यपाल अरीफ मोहम्मद खान यांना सादर केली. या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकंदर 243 पैकी 202 स्थाने प्राप्त करुन ऐतिहासिक विजय प्राप्त केलेला आहे.

दिल्लीतही बैठक

संयुक्त जनता दलाचे कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा यांनी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमवेत बिहारमधील सरकारच्या स्थापनेसंदर्भात चर्चा केली आहे. नितीश कुमार यांनी या निवडणुकीत इतिहास घडविला आहे. या निवडणुकीत 2010 च्या विधानसभा निवडणुकीसारखे परिणाम मिळणार आहेत, याची आम्हाला आधीपासूनच कल्पना होती. कारण बिहारमधील मतदारांचा प्रतिसादच तशा प्रकारचा होता. आमचे अनुमान खरे ठरले, असे त्यांनी स्पष्ट केले.

गांधी मैदानात होणार शपथविधी

बिहारची राजधानी पाटणा येथे असलेल्या ऐतिहासिक गांधी मैदानात नव्या राज्य सरकारचा शपथविधी होणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी सज्जता करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासंबंधी निश्चित माहिती येत्या एक-दोन दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. हा शपथविधी सोहळा अधिकाधिक लोकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहता यावा, यासाठी गांधी मैदान या स्थानाची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संयुक्त जनता दलाच्या प्रवक्त्याने दिली. नितीश कुमार हे दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. हा भारतातला विक्रम आहे. मधल्या काळातील काही महिन्यांचा अपवाद वगळता, नितीश कुमार हे 2005 पासून सातत्याने बिहारचे मुख्यमंत्री आहेत.

नव्या बिहार विधानसभेतील बलाबल

एकंदर जागा 243

सत्ताधारी रालोआ 202

भारतीय जनता पक्ष 89

संयुक्त जनता दल 85

लोकजनशक्ती (रापा) 19

हिंदुस्थान अवाम मोर्चा ५

राष्ट्रीय लोकशाही आघाडी 4

महाआघाडी 35

राष्ट्रीय जनता दल 25

काँग्रेस 6

डावे पक्ष 4

इतर आणि अपक्ष

एमआयएम 5

बहुजन समाज पक्ष १

Comments are closed.