नितीश कुमार आज दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत
रालोआच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड : शपथविधीसाठी दोन व्यासपीठ,150 पाहुण्यांना विशेष निमंत्रण,पंतप्रधान मोदींचीही उपस्थिती
वृत्तसंस्था/पाटणा
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेची उलटी गिनती सुरू झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार गुरुवारी गांधी मैदानात होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. हा समारंभ विशेष होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी याची पुष्टी केली आहे. एनडीएकडून बुधवारी सरकार स्थापनेशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जेडीयू आणि भाजप या दोघांनीही आपापल्या गटनेत्याची निवड केल्यानंतर राज्यपालांना भेटून शपथविधी सोहळ्याचा मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे.
बिहारचे राजकारण एका ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करत आहे. 20 नोव्हेंबर रोजी पाटणा येथील गांधी मैदानात नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा प्रसंग भारतीय राजकीय इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विविध केंद्रीय मंत्री आणि एनडीएचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
पाटण्यात बुधवार सकाळपासूनच राजकीय हालचाली तीव्र झाल्या होत्या. नवीन एनडीए सरकार स्थापनेबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू होते. जेडीयूच्या बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे, तर भाजपच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. विजय सिन्हा यांची उपनेते म्हणून निवड झाली आहे.
एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड झाली आहे. सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांचे नाव सुचवले होते. नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना राजीनामा सादर करत नवीन सरकार स्थापनेचा दावा केल्यामुळे त्यांचा विक्रमी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिहारमध्ये आता सत्तावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, प्रत्येक मित्र पक्षाला किती मंत्रीपदे मिळतील आणि मंत्रिमंडळे कशी वाटली जातील हे गुरुवारीच स्पष्ट होईल. विधानसभेच्या अध्यक्षांपासून ते एकूण सत्ता रचनेपर्यंत सत्तेचे चित्र अजूनही अस्पष्ट आहे.
नवीन सरकारमध्ये ‘टॉप थ्री’ कायम
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होतात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तेच राहतील असे मानले जात आहे. साहजिकच, मंत्रिमंडळातील ‘टॉप थ्री’ नेते नवीन सरकारमध्येही कायम राहतील. भाजप विधिमंडळ पक्षाने सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्री म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. सम्राट चौधरी यांची नेतेपदी आणि विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड झाल्याने त्यांची मंत्रिपदे कायम राहणार असल्याचे मानले जात आहे.
केशव प्रसाद मौर्य यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती
भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बुधवारी पक्ष कार्यालयात झाली. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात आली. भाजप संसदीय मंडळाने यासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली होती. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती सह-निरीक्षक म्हणून पाटणा येथे पोहोचले होते. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली.
एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक
एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी 3:30 वाजता विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. या बैठकीला भाजप, जेडीयू, एलजेपी, एचएएम आणि आरएलएमचे एकूण 202 आमदार उपस्थित होते. तसेच नितीश कुमार, चिराग पासवान, संतोष सुमन, उपेंद्र कुशवाह, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
नितीश कुमार यांची ऐतिहासिक वाटचाल
भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या नेत्याला सलग दहावेळा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाणार आहे. नितीश कुमार यांनी मार्च 2000 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांचा कार्यकाळ फक्त सात दिवसांचा असला तरी, 2005 पासून ते सतत बिहारमध्ये सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. अनेकवेळा युती बदलल्या, सरकारे पडली आणि स्थापन झाली, परंतु नितीश कुमार प्रत्येक वेळी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर टिकून राहिले आहेत. आज ते पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्यामुळे भारतीय राजकारणात एक नवा विक्रम प्रस्थापित होईल.
20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता
सूत्रांनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन उपमुख्यमंत्री आणि सुमारे 20 मंत्र्यांसह शपथ घेतील. यामध्ये भाजप, जेडीयू, एलजेपी, हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) चे आमदार असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी अंतिम करत आहेत. तर मुख्यमंत्री नितीश कुमार जेडीयू मंत्र्यांची यादी तयार करत आहेत. हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे संतोष कुमार सुमन हे नवीन सरकारमध्ये मंत्री राहतील. लोजपा (आर) मधील राजू तिवारी यांच्याव्यतिरिक्त अनुसूचित जातीच्या आणखी एका आमदाराला कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिली जाऊ शकते. आरएलएमच्या प्रा. स्नेहलता यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते. त्या पहिल्यांदाच सासाराम येथून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
Comments are closed.