नितीश कुमार यांचा भव्य शपथविधी सोहळा

दहाव्यांदा शपथेचा विक्रम, 26 मंत्र्यांचीही नियुक्ती

वृत्तसंस्था/पाटणा

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळविल्यानंतर आता नितीश कुमार यांनी दहाव्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा त्यांचा नवा विक्रम आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील ऐतिहासिक गांधी पटांगणात लक्षावधी लोकांच्या साक्षीने शपथविधी समारंभ गुरुवारी पार पडला. नितीश कुमार यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या 2 उपमुख्यमंत्र्यांनही शपथग्रहण केले आहे. त्यांची नावे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा अशी आहेत. 26 मंत्र्यांनाही या कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ राज्यपाल अरीफ मोहम्मद खान यांनी दिली.

या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित राहिले आहेत. त्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश न•ा आणि इतर अनेक महत्वाचे नेतेही उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता असलेल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 71 वर्षांचे नितीश कुमार हे बिहारच्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे ते विधानसभा निवणुकीत उमेदवार नव्हते.

9 नवे चेहरे

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात 9 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. हे मंत्रिमंडळ नवे चेहरे आणि जुनी अनुभवी नेते यांचे मिश्रण आहे, अशी माहिती देण्यात आली. मंत्रिमंडळात समावेश करताना धर्म, जाती, सामाजिक पार्श्वभूमी आदी घटकांचे भान राखण्यात आल्याचे दिसून येते, असे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. या मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाचे 14, संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार यांच्यासह 9, लोकजनशक्ती (रापा) चा 1, हिंदुस्थान आवाम मोर्चाचा 1 तर राष्ट्रीय लोक मोर्चाचा 1 असे 26 मंत्री आहेत.

चर्चा विधानसभा अध्यक्षांसंबंधी

बिहार मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर आता विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार, याची चर्चा होत आहे. विद्यमान विधानसभेत हे पद भारतीय जनता पक्षाकडे आहे. याहीवेळी ते भारतीय जनता पक्षाकडेच राहील, अशी शक्यता आहे. प्रारंभी संयुक्त जनता दलाने या पदाची मागणी केली होती. तथापि, नंतर ते भारतीय जनता पक्षाकडेच दिले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीं नितीश कुमार गृहमंत्रीपद स्वत:कडे ठेवण्याची शक्यता आहे.

मान्यवरांची उपस्थिती

शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांच्यात आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तसेच अनेक केंद्रीय मंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते.

तीन महिलांचा समावेश

कुमार यांच्या मंत्रिमंडळात तीन महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

असे आहे बिहारचे मंत्रिमंडळ…

  • संयुक्त जनता दलाचे मंत्री- नितीश कुमार (मुख्यमंत्री), अशोक चौधरी, मोहम्मद झमा खान, लेसी सिंग, मदन साहनी, सुनिल कुमार, विजयकुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव आणि श्रावण कुमार असे या पक्षाचे नऊ मंत्री आहेत.
  • भारतीय जनता पक्षाचे मंत्री- सम्राट चौधरी (उपमुख्यमंत्री), विजय सिन्हा (उपमुख्यमंत्री), दिलीप कुमार जयस्वाल, मंगल पांडे, रामकृपाल यादव, संजयसिंग तिगेर, अरुण शंकर प्रसाद, सुरेंद्र प्रसाद मेहता, नारायण प्रसाद, रमा निषाद, लखेंद्र कुमार रोशन, श्रेयसी सिंग, प्रमोद कुमार आणि नितीन नबीन असे 14 मंत्री भारतीय जनता पक्षाकडून या मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत.
  • लोकजनशक्तीचे मंत्री- संजय कुमार
  • हिंदुस्थान आवाम मोर्चाचे मंत्री- संतोष कुमार सुमन
  • राष्ट्रीय लोकमोर्चाचे मंत्री- दीपक प्रकाश

Comments are closed.