नितीश कुमार यांचा सोमवारी राजीनामा

एकवीस वर्षांच्या सत्तेनंतर सोडणार मुख्यमंत्रीपद

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार येत्या सोमवारी, अर्थात, 13 एप्रिलला मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतील, अशी माहिती देण्यात आली आहे. ते जवळपास 21 वर्षे या पदावर राहिल्यानंतर आता त्यागपत्र देणार आहेत. त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. 14 एप्रिलला बिहारमध्ये नव्या मुख्यमंत्र्याची निवड होण्याची शक्यता आहे. यावेळी हे पद भारतीय जनता पक्षाला मिळणार असून बव्हंशी सम्राट चौधरी यांची या पदावर निवड केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सम्राट चौधरी सध्या बिहारच्या मंत्रिमंडळातील एका उपमुख्यमंत्रीपदी आहेत.

शनिवारी संयुक्त जनता दलाच्या अनेक नेत्यांनी नितीश कुमार यांची त्यांचे अधिकृत निवासस्थान 1, अॅनी मार्ग, पाटणा येथे भेट घेतली. या दोन तास चाललेल्या बैठकीत राज्यातील सत्तांतरासंबंधी विचारविमर्श करण्यात आला. सत्तांतरासंबंधी कोणतीही समस्या नाही. ते सुरळीत पार पडेल, असे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील बिहार सरकारमध्ये  संयुक्त जनता दलाला दोन उपमुख्यमंत्रीपदे दिली जाणार असून महत्वाची खातीही दिली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. सत्तावाटपाचे सूत्र साधारणत: नितीश कुमार यांच्या सरकारप्रमाणेच असेल. त्या सरकारात जे विभाग भारतीय जनता पक्षाकडे होते. त्यांच्यातील अनेक संयुक्त जनता दलाला देण्यात येतील. तर संयुक्त जनता दलाचे अनेक विभाग भारतीय जनता पक्षाला मिळतील, अशीही चर्चा आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी मंगळवारी होण्याची शक्यता आहे.

आवराआवरीला प्रारंभ

पाटणा येथील मुख्यमंत्री निवासात गेल्या दोन दिवसांपासून आवराआवरीला प्रारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सामानाची बांधाबांध करण्यात येत आहे. यावरुन ते मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्यानंतर त्वरित आपले अधिकृत निवासस्थानही सोडतील, अशी चर्चा आहे. दिल्लीत राज्यसभा सदस्य म्हणून त्यांच्यासाठी नव्या निवासस्थानाची सोय त्वरित निर्माण करण्यात येत आहे.

सरकारला मार्गदर्शन करणार

नितीश कुमार राज्यसभेचे सदस्य झाले असले तरी, त्यांचे वास्तव्य अधिक काळ बिहारमध्येच असेल. त्यांना बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री या नात्याने नियमानुसार निवासस्थान मिळणार आहे. ते नव्या बिहार राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, संयुक्त जनता दलाचेही नेतृत्व करणार आहेत. सरकार आणि पक्ष त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपली पुढची वाटचाल करेल, अशी माहिती संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षानेही नितीश कुमार यांचे मार्गदर्शन मोलाचे असेल, असे स्पष्ट केले आहे. एकंदर, सत्तांतर सुलभ प्रकारे होईल, अशी शक्यता असल्याचे मत अनेक राजकीय तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

Comments are closed.