IPL 2026 – प्लेइंग 11 चा भाग नसतानाही पंचांना भिडला, नितीश राणा याला BCCI चा दणका
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात मैदानाबाहेर घडलेल्या एका वादामुळे दिल्लीचा फलंदाज नितीश राणा बीसीसीआयच्या रडारवर आला आहे. चौथ्या पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी नितीश राणावर कठोर कारवाई करण्यात आली असून त्याला सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नितीश राणा या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग नव्हता, तरीही डगआऊटमध्ये असताना पंचांशी केलेल्या गैरवर्तनामुळे त्याला ही शिक्षा भोगावी लागली आहे.
ही संपूर्ण घटना दिल्लीच्या डावातील 19 व्या षटकादरम्यान घडली. चेन्नईतील प्रचंड उकाड्यामुळे खेळाडू हैराण झाले होते. अशा परिस्थितीत दिल्लीचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने षटकाच्या मध्यात डगआऊटमधून करुण नायरला नवीन ग्लोव्हज घेऊन बोलावले. मात्र, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत चौथ्या पंचांनी नायरला मैदानात जाण्यापासून रोखले. पंचांच्या या निर्णयामुळे दिल्लीच्या गोटात संतापाचे वातावरण निर्माण झाले. पुढच्याच चेंडूवर स्टब्स बाद झाल्याने हा राग अधिकच अनावर झाला. डगआऊटमध्ये असलेल्या नितीश राणाने आणि सपोर्ट स्टाफने या मुद्द्यावरून चौथ्या पंचांशी बराच वेळ वाद घातला.
आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, राणाने आचारसंहितेच्या कलम 2.3 चे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे, जे सामन्यादरम्यान अपमानास्पद भाषेच्या वापराशी संबंधित आहे. या गुन्ह्यासाठी सामनाधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा राणाने स्वीकारली आहे. मैदानावर उष्णता इतकी जास्त होती की खेळाडूंना वारंवार पाणी आणि साहित्याची गरज भासत होती, मात्र नियमांच्या कचाट्यात पंचांनी परवानगी नाकारल्याने हा वाद विकोपाला गेला.
Comments are closed.