चेंगराचेंगरी प्रकरणात सीबीआयची चौकशी नाही
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीप्रकरणी सीबीआयकडून चौकशी करविण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. या दुर्घटनेत मृतांची संख्या 200 पर्यंत असू शकते, परंतु रेल्वेकडून केवळ 18 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असल्याचा दावा संबंधित याचिकेत करण्यात आला होता.
न्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्याला या दाव्यामागी आधार विचारला होता. याचिकाकर्त्याकडे या प्रश्नाचे कुठलेच स्पष्ट उत्तर नव्हते. 15 फेब्रुवारी राजी रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या अनेक पीडितांना अद्याप भरपाई मिळालेली नाही असा दावा याचिका सादर करणाऱ्या आनंद लीगल फोरम ट्रस्टच्या वकिलाने केला. यावर न्यायालयाने तुम्ही अशा कुठल्याही व्यक्तीला ओळखता का अशी विचारणा केली. अद्याप भरपाई मिळाली नसल्यास संबंधित व्यक्ती स्वत: न्यायालयात धाव घेऊ शकतो. कुठल्याही ठोस माहितीशिवाय ही याचिका दाखल करण्यात आल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
याचिकेत रेल्वे अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणा आणि वस्तुस्थिती लपविल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली होती. रेल्वे स्थानक आणि रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी देखील या याचिकेद्वारे करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. संबंधित प्रकरणी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात देखील प्रलंबित आहे. या याचिकेत प्लॅटफॉर्म आणि रेल्वेत लोकांच्या प्रवेश करण्याशी संबंधित नियम पूर्णपणे लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या सुचनेला महत्त्वपूर्ण मानत रेल्वेला भूमिका मांडण्यास सांगितले आहे.
Comments are closed.