‘नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर.. कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा गणेशोत्सव करावा; जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुखांचे आवाहन

‘नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर.. ‘चा संदेश देशाला देत, कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा आणि कायद्याच्या चौकटीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात नियमांचे पालन करून, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी केले.

शांतता व दक्षता समिती सदस्य तसेच गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा व पोलीस प्रशासनासह महापालिका आणि जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासह नियमांचे पालन करणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. सर्व गणेश मंडळांनी पर्यावरणरक्षणासह विविध सामाजिक संदेशांवर आधारित देखावे सादर करावेत. मंडळांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादा ओलांडली जाणार नाही, लेझरचा वापर होणार नाही, याची दक्षता घेऊन तसेच कोणतेही गालबोट लागू न देता, हा उत्सव आनंदाने साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले.

दरम्यान, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर ओळखला जातो. यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये ‘नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर…’चा संदेश देशाला कृतीतून देऊया आणि चित्रनगरीसाठी प्रसिद्ध असणारे कोल्हापूर शांततानगरी असल्याचेही दाखवून देऊया, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्य. अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले.

पारंपरिक वाद्यांचा वापर करा – पोलीस अधीक्षक गुप्ता

कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण, तरुणी, महिला व नागरिकांच्या उपस्थितीने मोठ्या गर्दीत; पण कायद्याच्या चौकटी पाळून उत्साहाने गणेशोत्सव साजरा करूया, असे आवाहन करून समिती सदस्य व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘गणराया अॅवॉर्ड’ या वर्षीपासून पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासनही पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिले. श्रीगणेशाच्या मूर्तीचा आकार, डॉल्बीचा आवाज, मंडळांभोवती जमणाऱ्या नागरिकांची संख्या, मोठा मंडप, यावर गणेशाची श्रद्धा ठरत नाही. कोल्हापूरला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. मंडळांनी देखाव्यांमधून ‘स्वस्थ आणि सुरक्षित कोल्हापूर’ चा संदेश द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून, अशा मंडळांना पोलीस विभागाचे पथक भेट देण्याबरोबरच अडचणी जाणून घेईल, असेही त्यांनी सांगितले.

पाऊस थांबताच रस्ते दुरुस्ती – आयुक्त के. मंजूलक्ष्मी

शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी विभागनिहाय निधीवाटप करण्यात येत असून, पाऊस थांबल्यावर रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात येतील. गणेशोत्सव व मिरवणूककाळामध्ये विद्युत व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.

Comments are closed.