आता जलालाबाद नाही, आता परशुराम पुरी.

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय

लखनौ : उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने सोमवारी मोठा निर्णय घेतला आहे. याच्या अंतर्गत शाहजहांपूर जिल्ह्यातील जलालाबाद तालुक्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आता तालुक्याला ‘भगवान परशुराम पुरी’ नाव देण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर संबंधित प्रशासकीय प्रक्रिया आता पुढे नेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने यापूर्वीच या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

उत्तरप्रदेश मंत्रिमंडळाची बैठक लखनौच्या 5 कालिदास येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली आहे. यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्व मंत्री सामील झाले. बैठकीत अनेक प्रस्तावांवर मोहोर उमटली आहे. उत्तरप्रदेशात स्टार्टअप मिशन स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच डाटा सेंटर धोरण 2026 मंजूर करण्यात आले आहे. बैठकीत योगींनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यांचे स्मरण केले.

 

Comments are closed.