रशियाशी कोणतेही नवीन तेलाचे व्यवहार नाहीत

भारतीय कंपन्यांना सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांनी रशियाकडून नव्या कच्च्या तेलाची खरेदी थांबविली असल्याचे दिसून येत आहे. कंपन्यांना भारत सरकारकडून स्पष्ट आदेशाची प्रतीक्षा आहे. अमेरिकेने रशियाच्या प्रमुख तेलविक्री कंपन्यांवर कठोर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे भारतीय कंपन्यांनी या कंपन्यांशी तेल विक्रीचे नवे व्यवहार केलेले नाहीत. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांसंबंधी भारताची भूमिका काय आहे, यासंबंधी स्पष्टता आल्यानंतर पुढचे व्यवहार करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, अशी भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांची भूमिका आहे.

भारताच्या काही कंपन्यांनी आता आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्च्या तेलाची खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे. पेट्रोल आणि डिझेलची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठ्या असणाऱ्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑईल कंपनीने कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी नव्या निविदा जागतिक बाजारपेठेत काढल्या असून रिलायन्स इंडस्ट्रीजने ‘स्पॉट’ खरेदीचा मार्ग स्वीकारला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमेरिकेचे निर्बंध

गेल्या आठवड्यात अमेरिकेने रशियाच्या ‘ल्युकॉईल’ आणि ‘रोसनेफ्ट’ या दोन सर्वात मोठ्या तेल विक्री कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. याच कंपन्यांवर युरोपियन महासंघ आणि ब्रिटनने निर्बंध यापूर्वीच घातले आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या तेलविक्रीत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. भारतालाही आता रशियाकडून तेल खरेदी करणे जवळपास अशक्य झाले आहे, अशी स्थिती आहे.

नव्या तेल विक्री कंपन्यांचा शोध

भारताच्या तेलशुद्धीकरण कंपन्यांना आता नव्या कंपन्यांचा शोध घ्यावा लागत आहे. अमेरिकेने निर्बंधीत केलेल्या कंपन्यांकडून तेल खरेदी करण्यास बँका अनुमती देणार नाहीत. त्यामुळे तेल खरेदीचे पेमेंट अडकण्याची शक्यता आहे. परिणामी, भारताच्या कंपन्यांनीही आता रशियाकडून होणारी तेल खरेदी जवळपास थांबविली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये अशी परिस्थिती प्रथमच उद्भवली आहे. रशियाने युक्रेनशी होत असलेले युद्ध न थांबविल्याने अमेरिका आणि युरोपियन महासंघ यांनी निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्वीइतके स्वस्त नाही

भारताने रशियाकडून होणारी तेल खरेदी कमी करण्याचे एकमेव कारण अमेरिकेचे निर्बंध हे नाही. रशिया भारत आणि इतर देशांना बाजारभावापेक्षा कमी दरात तेल विकत आहे. तथापि, गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर उतरले आहेत. त्यामुळे रशियाकडून मिळणारे तेल आता पूर्वीइतके स्वस्त नाही. रशिया देत असलेला डिस्काऊंट आता बराच कमी झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून तेल खरेदी करणे आणि रशियाकडून तेल खरेदी करणे यात किमतीच्या दृष्टीने फारसा फरक उरलेला नाही, अशी स्थिती आहे.

अमेरिकेकडून भारताची तेल खरेदी

भारताने आता अमेरिकेकडून तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वी भारताच्या तेल खरेदीत अमेरिकेचा वाटा केवळ 2 टक्के होता. तो आता वाढून जवळपास 10 टक्क्याच्या आसपास पोहचला आहे. नजीकच्या भविष्यकाळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. रशियाकडून तेलाची खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापारी शुल्क लावले आहे. आता भारत अमेरिकेकडून तेलाची खरेदी करत असल्याने पुढच्या काळात या व्यापारी शुल्कात काय परिवर्तन होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या भारत जवळपास 20 भिन्न भिन्न देशांकडून तेलखरेदी करत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबल्याशिवाय रशियाकडून तेल खरेदी करणे अशक्य होणार आहे.

 

Comments are closed.