ट्रम्प यांना नोबेल समितीचा ठेंगा! सर्व प्रकारे प्रयत्न करूनही शांतता पुरस्कार नाहीच
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आजचा दिवस एक निराशाजनक दिवस आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्ती करून विविध देशांमधील युद्ध थांबवल्याचा दावा करून, कॅम्पेन राबवून, दबाव टाकून देखील ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार झाला नाही. नोबेल समिती ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकली नाही, यामुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक सुरू आहे.
आपणच शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचा दावा केल्यानंतर, नोबेल समितीने या वर्षीचा पुरस्कार एका ‘बहादूर महिलेला’ दिला आहे. व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांसाठी आणि देशाला शांततेच्या मार्गाने हुकूमशाहीतून लोकशाहीकडे नेण्याच्या अथक प्रयत्नांसाठी मारिया कोरिना माचाडो यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, असे समितीने जाहीर केले. या घोषणेत ट्रम्प यांचा कोणताही उल्लेख नव्हता.
नोबेल समितीने आपल्याला डावलल्याबद्दल ट्रम्प यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु ते काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. विशेषतः, त्यांनी स्वतःला जागतिक शांतीदूत म्हणत जगभरातील सात युद्धे थांबवण्यास मदत केल्याचा वारंवार दावा केला आहे.
व्हाइट हाऊसनेही ट्रम्प यांच्या या दाव्याला दुजोरा देत, त्यांच्या कौतुकाची मोहीम दिवस-रात्र चालवली होती. काही तासांपूर्वी, त्यांनी ट्रम्प यांचा निळ्या सूट आणि पिवळ्या टायमधील एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते व्हाईट हाऊसच्या कॉरिडॉरमधून चालताना दिसत होते. ‘द पीस प्रेसिडेंट’ (शांततेचे राष्ट्राध्यक्ष) असे त्या फोटोला कॅप्शन दिले होते.
ट्रम्प यांनी अनेक महिने दावा केला होता की त्यांचे ओव्हल ऑफिस जगभरातील सर्व शांतता करारांचे केंद्र बनले आहे. जानेवारीमध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वीच, त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्त्रायल-हमास संघर्ष संपवण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. मात्र, या संघर्षांचा अद्यापही शेवट झालेला नाही.
याव्यतिरिक्त, त्यांनी मे महिन्यात हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवण्याचे श्रेयही घेतले होते. हिंदुस्थानकडून मात्र त्यांचे हे दावे फेटाळून लावण्यात आले होते. तर दुसरीकडे पाकिस्तानने मात्र ट्रम्प यांना नोबेल मिळावे यासाठी त्यांचे समर्थन केले होते.
चार माजी राष्ट्राध्यक्षांना मिळाले आहे नोबेल
मागील काळात किमान चार अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे, ज्यात थियोडोर रुझवेल्ट (1906), वुडरो विल्सन (1919) आणि जिमी कार्टर (2002) यांचा समावेश आहे. बराक ओबामा यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्याच वर्षात, 2009 मध्ये, आण्विक निशस्त्रीकरणासाठी आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीला बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल हा पुरस्कार मिळाला होता.
ट्रम्प यांनी या वर्षाचा पुरस्कार जाहीर होण्याच्या काही तास आधी टीका केली होती की, ‘ओबामांना एक पुरस्कार मिळाला – त्यांना तो कशासाठी मिळाला हे माहीत नाही – ते निवडून आले, आणि त्यांनी काहीही न करता तो पुरस्कार ओबामांना दिला, फक्त आपल्या देशाचा नाश करण्यासाठी’, असेही ते म्हणाले.
Comments are closed.