नवी मुंबई विमानतळ परिसरात मांस विक्रीवर बंदी,नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा आदेश

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात मांसविक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून 3 किमी अंतरावरील उलवे परिसरात मांसविक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नवी मुंबई विमानतळाच्या हद्दीत होत असलेली मांसविक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
विमानतळाच्या 10 किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करू नये असा नियम आहे. असे असतानाही नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीपासून 3 किमी अंतरावरील उलवे सेक्टर 19 येथे प्राण्यांची कत्तल करून मांसविक्री केली जात आहे. यामुळे नागरी विमान वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत पर्यावरणप्रेमी आणि नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या बी.एन. कुमार यांनी फेब्रुवारी महिन्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली होती. यासंदर्भात डीजीसीएच्या हवाई सुरक्षा शाखेने मार्च महिन्यात चौकशी सुरू केली होती. ही तक्रार डीजीसीएअंतर्गत एअर सेफ्टी संचालक ए.एक्स. जोसेफ यांच्याकडे पाठवण्यात आली होती. दरम्यान, डीजीसीएने नवी मुंबई विमानतळ परिसरात मांसविक्री बंदीचे आदेश दिले आहेत.
पक्ष्यांची संख्या वाढून विमान उड्डाणास धोका
उघडय़ावर मांसविक्री केल्यामुळे विमानतळ परिसरात कावळे, घार यासह विविध पक्षी आकर्षित होतात. विविध प्रकारचे पक्षी उघडय़ावर टाकलेले प्राण्यांचे अवशेष खाण्यासाठी परिसरात येतात. त्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढून विमान उड्डाणास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमानतळ परिसरात स्वच्छतेचे सर्व नियमही धाब्यावर बसवले जात आहेत. मांस विक्रीमुळे विमानतळाच्या आसपास मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरून नागरिकांना धोका होऊ शकतो.
– महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्थापन केलेल्या एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समितीच्या नियमावलीतही विमानतळाच्या 10 किमीच्या परिसरात प्राण्यांची कत्तल करू नये असे नमूद केलेले आहे.
Comments are closed.