क्रिकेटविश्वात खळबळ; पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंना 4 संघांकडून कायमचा ‘बॅन’, नेमकं काय घडलं?
द हंड्रेड 2026 मध्ये पाकिस्तानी खेळाडू नाहीत : भारताशी बिघडलेल्या संबंधांचा फटका आता पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना ‘द हंड्रेड’ स्पर्धेतही बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘द हंड्रेड’मधील चार संघांचे मालक भारतीय आहेत आणि त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. मँचेस्टर ओरिजिनल्स (Manchester Originals), ओव्हल इन्व्हिन्सिबल्स (Oval Invincibles), सदर्न ब्रेव्ह (Southern Brave) आणि नॉर्दर्न सुपरचार्जर्स (Northern Superchargers) या संघांमध्ये आता पाकिस्तानी खेळाडू दिसणार नाहीत. या चारही संघांचे मालक भारतीय उद्योगपती आहेत.
‘द हंड्रेड’ची लिलाव प्रक्रिया दोन दिवस चालणार आहे. 11 मार्च रोजी महिला खेळाडूंसाठी, तर 12 मार्च रोजी पुरुष खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. हा लिलाव लंडनमध्ये पार पडणार आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, सुमारे 18 देशांतील जवळपास 1,000 क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचाही समावेश आहे, मात्र या चार संघांकडून त्यांच्यावर बोली लावली जाणार नाही.
भारत–पाकिस्तान संबंधांचा परिणाम
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण आहेत. गेल्या वर्षभरात दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आयपीएलशी संबंधित कोणतीही फ्रँचायझी पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या संघात स्थान देत नाही.
फक्त आयपीएलपुरतेच नाही, तर SA20 आणि CPL सारख्या इतर लीगमध्येही भारतीय मालकी असलेल्या संघांकडून पाकिस्तानी खेळाडूंना संधी दिली जात नाही. ILT20 स्पर्धेतही केवळ अमेरिकन मालकीच्या संघानेच पाकिस्तानच्या खेळाडूंना करारबद्ध केले आहे.
2026 हंड्रेड लिलावापूर्वीच निर्णय
बीबीसीच्या वृत्तानुसार, ईसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अनौपचारिकरीत्या एका खेळाडू एजंटला सांगितले की आयपीएलशी संबंधित चारही फ्रँचायझी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.
‘द हंड्रेड’च्या विक्रीपूर्वी ईसीबीचे कार्यकारी अध्यक्ष रिचर्ड गोल्ड यांना भारतीय गुंतवणुकीनंतर पाकिस्तानी खेळाडूंना लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी देशाच्या आधारावर भेदभाव होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र सध्याची परिस्थिती वेगळेच चित्र दर्शवत आहे.
पुरुष गटातील ‘द हंड्रेड’मध्ये यापूर्वी मोहम्मद अमीर, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि हरिस रौफ यांसारखे खेळाडू सहभागी झाले होते. आता पुढील लिलावात या खेळाडूंचे भवितव्य काय ठरणार, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.