IND vs WI: फिरकीपटूंना मदत नाही? रवींद्र जडेजाने उघड केली खेळपट्टीबाबत संघ व्यवस्थापनाची मागणी

मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध टर्निंग खेळपट्टीची मागणी उलटी ठरली होती आणि भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याची संधी गमवावी लागली होती. त्यामुळेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या चालू मालिकेत फिरकी गोलंदाजीला जास्त साथ देणाऱ्या खेळपट्टीची मागणी संघ व्यवस्थापनाने केली नाही.

टीम इंडियाचा फिरकीपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सांगितले की, आम्ही फक्त हळू-हळू टर्न घेणाऱ्या खेळपट्टीची मागणी केली होती. त्यामुळे अरुण जेटली स्टेडियम मधील मैदानावर विकेट मिळवण्यासाठी जास्त शारीरिक मेहनत घ्यावी लागते. दुसऱ्या दिवशी जडेजाने 3 विकेट्स घेतल्या पण त्याला खेळपट्टीकडून फारसा टर्न मिळत नसल्याची खंत नव्हती. तो म्हणाला की, जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा खेळपट्टीवरून टर्न मिळेल, म्हणून काटेकोर गोलंदाजी करावी लागेल.

जडेजा म्हणाला की, या खेळपट्टीवर उंच उसळी नाही, चेंडू हळू आहे आणि जास्त टर्नही मिळत नाही. त्यामुळे फलंदाजांना मागे उभे राहून खेळणे सोपे जात आहे. गोलंदाजांना खांद्याचा जास्त वापर करावा लागेल, कारण प्रत्येक चेंडू टर्न होत नाही. त्याने पुढे सांगितले की, जर आपण सध्याची भागीदारी मोडली तर आपल्याला विकेट घेणे सोपे जाईल, कारण वेस्ट इंडिजच्या फलंदाजीला फारशी खोली नाही.

याच वेळी, जडेजाने यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal & shubman gill) आणि शुबमन गिल यांच्या धाव घेण्यात झालेल्या गैरसमजावरही प्रतिक्रिया दिली. जयस्वाल धावबाद झाल्यावर गिलवर नाराज दिसत होता, पण जडेजा म्हणाला की, अशा गोष्टी मैदानावर घडत असतात, त्याला जास्त महत्त्व द्यायला नको.

दुसऱ्या दिवसाखेरीस वेस्ट इंडिजने 4 गडी गमावून 140 धावा केल्या होत्या. भारताच्या पहिल्या डावाच्या तुलनेत ते अजूनही 378 धावांनी पिछाडीवर आहेत. शाय होप 31 आणि टेविन इम्लाच 14 धावांवर खेळत होते. यापूर्वी भारताने पहिल्या डावात 518/5 वर डाव घोषित केला होता. यशस्वी जयस्वाल 175 धावांवर धावबाद झाला आणि द्विशतक गमावले.

कर्णधार शुबमन गिलने शानदार खेळ करत नाबाद 129 धावा ठोकल्या. त्याच्या सोबत नितीश रेड्डीने 43 आणि ध्रुव जुरेलने 44 धावा केल्या. भारतासाठी जडेजाने 3 तर कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.

Comments are closed.