ठाणे महापालिकेच्या विषय समित्या वाऱ्यावर; परिवहन, शिक्षण, आरोग्य, पाण्याच्या समस्या सोडवणार तरी कोण?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होऊन दोन महिने उलटले तरी ठाणे महापालिकेच्या विषय समित्या वाऱ्यावर आहेत. ठाणे महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही अद्याप स्थायी समिती, विषय समित्या तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. एकीकडे अर्थसंकल्पावर चार दिवस जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे परिवहन, शिक्षण, आरोग्य तसेच शहरातील गंभीर समजली जाणारी पाण्याची समस्या सोडवणार तरी कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे.

ठाणे महापालिकेत शिंदे गटाला ७५, भाजप २८, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार १२, अजित पवार गट ९, एमआयएम ५, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १ आणि अपक्ष १ असे १३१ नगरसेवकांचे समीकरण आहे. त्यातही शिंदे गटाने एकहाती सत्ता प्रस्थापित केली असल्याने स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन, विषय समित्यांमध्ये शिंदे गटाला मोठा वाटा मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र अद्याप कोणत्याच महत्त्वाच्या समित्या तसेच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने पालिकेच्या वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

घोंगडे भिजत ठेवल्याने संभ्रम
ठाणे पालिकेची ५ मार्चला विशेष महासभा घेतली जाणार होती. परंतु अवघ्या एका दिवसांत प्रशासनाने घुमजाव करत सदस्य निवडीची प्रक्रिया पुढे ढकलली. १८ मार्चला होणाऱ्या महासभेत सदस्य निवडीचे विषय मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु त्या महासभेत सदस्य निवडीचा विषय घेण्यात आला नाही. त्यानंतर २३ मार्चला पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र अद्याप विषय समित्यांचे घोगडें भिजत ठेवले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला आहे.

नेमके गौडबंगाल काय? केळकरांचा सवाल
ठाणे पालिकेत अर्थसंकल्पीय सभा सुरू असताना भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी आज अचानक ठाणे पालिकेत हजेरी लावली. भाजपच्या नगरसेवकांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता ते थेट महासभेच्या व्हीआयपी गॅलरीमध्ये आले. त्यामुळे सर्वच नगरसेवकांना आश्चर्याचा धक्का बसला. विकासाच्या दृष्टीने, महापालिकेच्या कामकाजामध्ये सर्व समित्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या समित्या गठीत न होण्यामागे नेमके गौडबंगाल काय आहे, असा सवाल केळकर यांनी केला आहे

Comments are closed.