नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ: राष्ट्राच्या सेवेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्घाटन : आशियातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ
वृत्तसंस्था/ नोएडा
उत्तर प्रदेशचे बहुप्रतिक्षित नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (जेवर विमानतळ) आता उ•ाणासाठी सज्ज झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हे सध्या देशातील सर्वात मोठे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ आहे. चौथा टप्पा पूर्ण झाल्यावर ते आशियातील सर्वात मोठे विमानतळ बनेल. उद्घाटनप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अनेक मंत्री उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी या विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थितांना त्यांच्या मोबाईल फोनचे फ्लॅशलाइट चालू करण्याचे आवाहन केले. हे विमानतळ सर्वांसाठी असल्याचे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले.
विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पंतप्रधान एका मोठ्या जनसभेला संबोधित केले. याप्रसंगी कोविड-19 च्या संकटकाळात अफवा पसरवणाऱ्या राजकारण्यांना सल्ला देताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर आरोपही केले. संपूर्ण जग संकटाच्या काळातून जात आहे. अशा परिस्थितीत, आपण सर्व भारतीयांनी एकजुटीने त्याचा सामना केला पाहिजे. हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. मी देशातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन करू इच्छितो की, अशा संकटकाळात देशाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी बोलणे टाळावे. भारतीयांच्या हिताचे आणि भारताच्या हिताचे काय आहे, हेच भारत सरकारचे धोरण आणि रणनीती आहे. परंतु देशाला हानी पोहोचवणाऱ्या कृतींना देशातील जनता कधीही माफ करत नाही, असे ते म्हणाले.
युवकांना नवसंजीवनी
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे युवकांना नवसंजीवनी देण्याचे हे एक अभियान आहे. विकसित उत्तर प्रदेशच्या दिशेने हे एक पाऊल आहे. यासाठी मी येथे उपस्थित असलेल्या तरुणांचे अभिनंदन करतो. तुम्ही मला नोएडा विमानतळाचे उद्घाटन करण्याचा मान दिला, पण हा मान मी तुमच्यासोबत वाटून घेतला. आज मी तुमच्या सर्वांसोबत मिळून या विमानतळाचे उद्घाटन करत असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले.
…हा उत्तर प्रदेशचा अभिमान अन् ओळख : राम मोहन नायडू
नोएडा विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनीही उपस्थितांना संबोधित केले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य आणि प्रतिष्ठित जेवर विमानतळाचे उद्घाटन झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. जेवर विमानतळामुळे केवळ उत्तर प्रदेश आणि दिल्ली एनसीआरच नव्हे, तर संपूर्ण भारत या उपलब्धीमुळे उत्साहित आहे. कारण देशाचे हृदय असलेल्या राजधानी दिल्लीला आज एक नवीन स्पंदन मिळाले आहे. जेवर टर्मिनलचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे, येथे भेट दिल्यावर तुम्हाला उत्तर प्रदेशचा अभिमान आणि ओळख अनुभवायला मिळेल. ही आमच्या पंतप्रधानांची दूरदृष्टी आहे, विकास आणि वारसा या दोन्हींची एक संकल्पना असल्याचा दावा केंद्रीय मंत्र्यांनी केला.
11,200 कोटी रुपये विमानतळ उभारणीचा खर्च
3000 एकर विमानतळाचे क्षेत्र
4 किलोमीटर विमानतळावरील धावपट्टी
80 किलोमीटर दिल्लीपासूनचे अंतर
भव्य जेवर विमानतळ आकर्षणाचा केंद्रबिंदू
विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या विमानतळाचा विकास पाच टप्प्यांत केला जाईल. 11,200 कोटी रुपये खर्च करून 3000 एकरहून अधिक क्षेत्रात पसरलेले आणि 4 किलोमीटर लांबीची धावपट्टी असलेले हे भव्य जेवर विमानतळ आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी पूर्णपणे सक्षम आहे. दिल्लीपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर हे विमानतळ वसलेले आहे. या विमानतळावर आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि सर्व-हवामान परिस्थितीत कार्यरत राहण्याची सोय आहे. पहिल्या टप्प्यातून दरवर्षी अंदाजे 1.2 कोटी प्रवाशांची वाहतूक हाताळली जाईल. कालांतराने या प्रकल्पाचा विस्तार अपेक्षित आहे.
Comments are closed.