‘सरके चुनर’ गाण्यावरून मोठा वाद; संजय दत्त आणि नोरा फतेहीला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स
आगामी कन्नड सिनेमा ‘केडी: द डेव्हिल’ मधील ‘सरके चुनर’ या गाण्यामुळे सध्या मनोरंजन सृष्टीसह देशभरात मोठा वादंग निर्माण झाला आहे. या गाण्यातील कथित अश्लीलता, असभ्य शब्द आणि सादरीकरणावरून जनमानसात संतापाची लाट उसळली असून, आता या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने या गाण्यातील सादरीकरण आणि शब्दांना आक्षेपार्ह मानत याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने नोरा फतेही, संजय दत्त, दिग्दर्शक प्रेम आणि गीतकार रकीब आलम यांना 24 मार्च 2026 रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
या गाण्याच्या हिंदी व्हर्जनमधील शब्दांवर नेटकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. गाण्यातील अनेक ओळी ‘डबल मिनिंग’ आणि बीभत्स असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गाण्यातील शब्दांमुळे हे गाणे कौटुंबिक प्रेक्षकांसाठी अयोग्य असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करत आयोगाने अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेता संजय दत्त, गीतकार रकीब आलम, निर्माता व्यंकट के. नारायण आणि दिग्दर्शक किरण कुमार यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर यासंदर्भात माहिती देताना आयोगाने स्पष्ट केले की, प्रथमदर्शनी हे गाणे लैंगिकदृष्ट्या उत्तेजक आणि अत्यंत आक्षेपार्ह वाटत आहे. हे गाणे केवळ असभ्य नसून भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि पॉक्सो कायद्याच्या विविध तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याचेही आयोगाचे म्हणणे आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व संबंधितांना मंगळवार, 24 मार्च 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता आवश्यक कागदपत्रांसह आयोगासमोर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. जर या आदेशाचे पालन झाले नाही, तर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही महिला आयोगाने दिला आहे.
केवळ महिला आयोगच नव्हे, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही (NHRC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मानवाधिकार आयोगाने यासंदर्भात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC), माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच गुगल इंडियाला नोटीस बजावून उत्तर मागवले आहे. वाढत्या कायदेशीर पेचामुळे आणि जनतेच्या तीव्र विरोधामुळे निर्मात्यांनी अखेर हे गाणे यूट्यूबवरून हटवले आहे. अर्जुन जन्या यांचे संगीत आणि मंगली यांचा आवाज असलेल्या या गाण्यातील सादरीकरणामुळे सध्या संजय दत्त आणि नोरा फतेही यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
Comments are closed.